पालघर : पालघर (Palghar) तालुक्यात अपघातांची (Accident) मालिका सुरू आहे. मागील तीन दिवसात तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येतेय. तसेच या अपघातांमध्ये आतापर्यंत सात जण जखमी झालेत. रविवार 4 फेब्रुवारी रोजी सकाळी चहाडे - गुंदले रस्त्यावर टायर फुटून कार उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली. चार जण गंभीर जखमी झालेत. जखमींना सध्या बेटेगाव येथील अधिकारी लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या अपघातांच्या मालिकांमुळे नागरिकांमध्येही चिंतेचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच यामध्ये मृत्यू झालेल्या नातेवाईकांवर देखील सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून याबाबत काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी देखील स्थानिकांकडून करण्यात येतेय. त्यामुळे प्रशासन यावर कोणत्या उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
चहाडे गुंदले-रस्त्यावर भीषण अपघात
सफाळे जवळील भादवे गावातील तरुणाच्या कारचा टायर फुटून भीषण अपघात झाल्याची घटना घडली. चहाडे गुंदले-रस्त्यावरील गर्वाशेत येथे कार उलटून झालेल्या अपघातात चंद्रकांत पाटील आणि उत्कर्ष राऊत या दोन तरुणांचा मृत्यू झाला. तसेच मयूर वैद्य,धीरज पाटील,मीत राऊत आणि लोकेश वैद्य हे चार तरुण जखमी झाले. सध्या त्यांना उपचारासाठी बेटेगाव येथील अधिकारी लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागझरी येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी हे सर्व तरुण जात असताना हा अपघात घडला.
दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन जण गंभीर जखमी
शुक्रवारी संध्याकाळी बोईसर चिल्हार रस्त्यावरील गुंदले दोन बंगला येथील क्रॉसिंगवर भरधाव स्कॉर्पिओ जीपने अचानक वळण घेणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी बाळु हेमाडा यांचा वलसाड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांची पत्नी सुरेखा हेमाडा आणि राजेंद्र आहडी या दोघांवर उपचार सुरू आहेत. तर शनिवारी पालघर मनोर रस्त्यावरील वाघोबा खिंडीतील वळणावर एक अवजड ट्रक टेम्पोवर उलटून झालेल्या अपघातात लहान मुलाचा मृत्यू झाला. या लहान मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जातेय.