पालघर : जिल्ह्यातील वीज महावितरण विभागाचा भोंगळ आणि मनमानी कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. डहाणूतील धानीवरी कोठबीपाडा येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्याला वीज महावितरण विभागाने एका महिन्याचं एक लाख 29 हजार रुपयांचं बिल दिल आहे. वार्षिक उत्पन्न 20 हजार रुपयांच्या जवळपास असलेल्या गायकर कुटुंबाला अचानक लाखोंच्या घरात बिल आल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


डहाणूतील धानीवरी कोटबीपाडा येथील अजीस बाबू गायकर यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून शासनाने घरकुल योजनेचा लाभ दिला. त्यामुळे घरात अवघे तीन बल्ब आणि एक फॅन इतकाच विजेचा वापर. गायकर कुटुंबाला मागील अनेक महिन्यांपासून 300 ते 600 रुपयांच्या घरात वीज बिल येत होतं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना देखील गायकर कुटुंबीय मागील अनेक महिन्यांपासून या वीज बिलाचा नियमित भरणा ते करत होते. मात्र आता सप्टेंबर महिन्याचं वीज बिल या कुटुंबाला तब्बल एक लाख 29 हजार रुपयांच्या घरात आलं आहे. 


त्यामुळे या वीज बिलाचा भरणा करायचा कसा असा गंभीर प्रश्न गायकर कुटुंबासमोर उभा राहिला आहे. तीन बल्ब आणि एका फॅन शिवाय घरात विजेवर चालणारी टीव्ही, फ्रिज असं कोणतंही उपकरण नाही. मात्र असं असताना देखील लाखोंच्या घरात आलेल्या बिलामुळे गायकर कुटुंबाची झोप उडाली आहे. वीज महावितरण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन हे बिल तुम्हाला भरणा करावाच लागेल असा सज्जड दम दिला जात असल्याचा आरोप गायकर कुटुंबाकडून करण्यात येतोय . 


डहाणूतील धानिवरी कोठबीपाडा येथील अजिस गायकर हे एकटे वीज महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराने त्रस्त नाहीत. या पाड्यातील 20 पेक्षा अधिक कुटुंबं सध्या याच वीज बिलाच्या चिंतेत आहेत. यापैकी अनेक कुटुंबांची नावं दारिद्र्यरेषेखाली असून या घरांमधील विजेचा वापर अत्यंत कमी आहे. महिन्याच्या अखेरीस येणारं 400, 500, 600 रुपयांचं वीज बिल येथील वीज ग्राहक नियमितपणे भरणा करतात. मात्र तरीदेखील येथील अनेक वीज ग्राहकांना 26 हजार, 61 हजार ,75 हजार तर काहीना थेट दीड लाखापर्यंत विज बिल देण्यात आल आहे. हे वीज बिल न भरल्यास घरांवर लावलेले वीज महावितरण विभागाचे मीटर काढून नेण्यात येईल असा इशारा या वीज ग्राहकांना महावितरणकडून देण्यात येतोय. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून हे वीज ग्राहक आपल्या खिशातील 400 ते 500 रुपये खर्च करून रोज वीज महावितरण विभागाच्या कार्यालयात खेटे मारतात मात्र तरी देखील यांना अपेक्षित उत्तर मिळत नाही. 


वीज महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारा विरोधात आपल्याला नेहमीच वीज ग्राहकांचा आक्रोश पाहायला मिळतो. याच वीज महावितरण विभागाच्या अनोगोंदी कारभाराचा ग्रामीण भागातील वीज ग्राहकांनाही मोठा फटका बसतोय. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन वीज महावितरण विभागाकडून त्यांची लूट केली जाते. नियमित रीडिंग न घेतल्याने हा प्रश्न उद्भवत असल्याच महावितरणकडून सांगण्यात आलं असलं तरी कॅमेरासमोर अधिक काहीही बोलण्यास त्यांच्याकडून नकार देण्यात आला आहे.