Palghar : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटून गेली आहेत. मात्र देशातील काही भाग मात्र अद्याप पारतंत्र्यांतच आहेत की काय? असा सवाल उपस्थित होतोय. अनेक भागांमध्ये नागरिकांना साध्या साध्या सोयी उपलब्ध नसल्यानं प्रचंड मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबईच्या नजीकच्या परिसरात देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे.  


स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी उलटली तरीही पालघरच्या ग्रामीण भागातील उपेक्षा अजूनही संपलेली दिसत नाही. मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी आजही मोठ्या जिकरीचा सामना करावा लागतोय.


मोखाड्यातील मरकटवाडी पाडा. 6 जुलै सकाळची घटना. गावातील सुंदर किरकिरे या महिलेची प्रकृती खालावली. बाहेर धो धो पाऊस आणि गावातून बाहेर जाण्यासाठी रस्ता नाही. आता सुंदर यांना रुग्णालयात न्यायचे तरी कसे हा प्रश्नच होता. शेवटी गावातील गावातील चार तरुणांनी प्लॅस्टिक आणि चादरीची डोली तयार केली. भरपावसात चार किलोमीटर पायपीट करत या तरुणांनी सुंदर यांना मुख्य रस्त्यापर्यंत आणले आणि तिथून वाहनाने सुंदर यांना खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. 


या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मुंबईपासून मोखाडा हे अंतर 140 किमी आहे. एकीकडे पंचतारांकित सुविधा असलेलं मोठं शहर तर तिथून काही अंतरावर असलेला हा पालघरचा आदिवासी बहुल भाग. या भागात अजूनही मुलभूत सुविधांची वाणवा आहे. लोकांना साध्या साध्या गोष्टींसाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.


देशाला स्वातंत्र्य मिळालं. यानंतर कित्येक सरकारं आली अन् गेली. प्रत्येक सरकारनं इथल्या लोकांना तुमचा विकास करु, रस्ते बांधू, आरोग्याच्या सुविधा देऊ अशी आश्वासनं दिली असतीलच. मात्र अजूनही या सुविधांच्या अभावामुळं लोकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतोय, हे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दिसून येत आहे. 


ठाण्याचे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री झाले असून आता तरी मुंबई, ठाण्यालगतच्या या आदिवासी पाड्यात प्राथमिक सुविधा उपलब्ध होतील का, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.