Palghar News : आशिया खंडातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्र असलेल्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील (Boisar Tarapur MIDC) कारखान्यांचा निष्काळजीपणा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं त्याकडे होणार दुर्लक्ष पुन्हा एकदा उघड झालं आहे. पालघरमधील (Palghar) बोईसर तारापूर एमआयडीसीतील कंपन्यांमधून निघणारं केमिकलयुक्त रासायनिक घातक सांडपाणी खुलेआम समुद्रात सोडण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


प्रदूषणात वाढ, समुद्रातील जैवविविधतेवरही परिणाम


बोईसर तारापूर एमआयडीसीत साडेबाराशे पेक्षाही अधिक लहान मोठे कारखाने आहेत. यामध्ये केमिकल तयार करणाऱ्या कंपन्या, फार्मासिटिकल कंपन्या, गारमेंट कंपन्या तसेच सर्व क्षेत्रातील कंपन्या स्थित आहेत. त्यामुळे येथील कंपन्यांमधून निघणारं रासायनिक सांडपाणी सीईटीपीमार्फत प्रक्रिया करुन पुढे ते बोईसर तारापूरच्या पश्चिमेस असलेल्या नांदगाव समुद्रकिनाऱ्यालगत समुद्रात सोडलं जातं. मात्र सध्या या कंपन्यांकडून हे केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच समुद्रात सोडलं जात असल्याचे वारंवार प्रकार उघडकीस येत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे परिसरातील प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून समुद्रातील जैवविविधतेवरही याचा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. 


किनाऱ्यालगतचे मासे नाहीसे, अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ


बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखाने राजरोसपणे अशा पद्धतीने आपलं केमिकलयुक्त घातक रासायनिक सांडपाणी खुल्या समुद्रात तसंच नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडले जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. मात्र या प्रकारामुळे परिसरातील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असून याचा परिणाम मासेमारीवरही होताना दिसत आहे. या केमिकलयुक्त रासायनिक सांडपाण्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगत सापडणारे अनेक मासे सध्या नाहीसे झाले असून मासेमारीवर उपजीविका करणाऱ्या अनेक कुटुंबांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे या सगळ्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष


बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांमधून निघणारं रासायनिक सांडपाणी हे सीईटीपीमार्फत प्रक्रिया करुन नंतरच ते समुद्रात सोडणे बंधनकारक आहे. मात्र या सगळ्या नियमांची पायमल्ली करत कंपन्या राजरोसपणे हे रासायनिक सांडपाणी खुलेआम समुद्रात सोडत आहेत. याबाबत स्थानिकांनी वारंवार तक्रारी अर्ज आणि आंदोलन करुनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या सगळ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर येत आहे.