Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच पक्षांनी जवळपास सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. पालघर विधानसभेची जागा महाराष्ट्रातील 288 जागांपैकी एक आहे आणि शिवसेनेसाठी ती अत्यंत महत्त्वाची जागा आहे. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही जागा कोणाच्या खात्यात जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार होते. दरम्यान पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झालेल्या 40 पैकी 39 जणांना उमेदवारी देण्यात आली. मात्र श्रीनिवास वनगा यांना डावलले आहे. पालघरमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात लढत पाहायला मिळणार असे वाटत होते, पण भाजपाने तेथून माजी खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. 


एकनाथ शिंदे यांच्या बंडात साथ देणारे श्रीनिवास वनगा यांना तिकीट नाकारल्यानंतर मोठा धक्का बसला. एबीपी माझाशी याच विषयी बोलताना श्रीनिवास वनगा यांनी सांगितलं की, मी प्रामाणिकपणे काम करत असताना सर्वांनी ठरवून माझी उमेदवारी डावलून लावली, त्यांनी सर्वांनी  माझा घात केला. उद्धव ठाकरे माझ्यासाठी देव आहेत त्यांची मला माफी मागायची आहे. त्यावेळी श्रीनिवास वनगा हे रडताना दिसले. 



2018 साली पालघर लोकसभेचे भाजपचे तत्कालीन खासदार चिंतामण वनगा यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक लागली होती. या पोटनिवडणुकीसाठी स्वर्गीय चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा हे इच्छुक असताना त्यांना डावलून दुसऱ्या उमेदवारास तिकीट देण्याचा घाट घातला जात होता. याचा संशय येताच श्रीनिवास वनगा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नाट्यमय रित्या उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. 2018 च्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांच्याविरोधात भाजपकडून राजेंद्र गावीत यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र या निवडणुकीत वनगा यांचा पराभव झाला. त्यावेळी उद्गव ठाकरे यांनी वनगा ना आमदारकी देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार 2019 विधानसभा निवडणुकीत पालघर मतदार संघातून श्रीनिवास वनगा यांनी काँग्रेसचे योगेश नम यांचा पराभव करीत ते आमदार बनले. 2022 मध्ये शिवसेना फुटीच्या वेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देत त्यांच्या सोबत राहणे पसंद केले. मात्र आता विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली मात्र फकत श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी कापण्यात आल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी आपली फसवणूक केल्याची खंत वनगा यांनी व्यक्त केली आहे.


हे ही वाचा -


Shrinivas Vanga : श्रीनिवास वनगा जीवन संपवण्याच्या विचारात, कुटुंबीयांचा दावा, एकनाथ शिंदेंना म्हणाले, तुम्ही शब्द पाळला नाही..


Katol Assembly Constituency: रॅली, सभा, शक्तीप्रदर्शन, पण 1 मिनिटांचा उशीर भोवला; सलील देशमुखांचा अर्ज दाखल करुन घेतलाच नाही