मुंबई : विधानसभेसाठी शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडून पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी लवकरच जाहीर होणार असून पालघर (palghar) विधानसभा मतदारसंघातून नेमकं कोणाला उमेदवारी देण्यात येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, येथील मतदारसंघातून विद्यमान आमदाराचा पत्ता कट होणार असल्याची माहिती आहे. त्यांच्याजागी भाजपमधून राजेंद्र गावित यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर यांच्यावर विश्वास ठेवलेल्या श्रीनिवास वनगा यांचा विश्वास सार्थ ठरणार की फोल हे लवकरच स्पष्ट होईल. विशेष म्हणजे श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे कारण देतच शिंदेंकडून बंडाची ठिणगी पडली होती. तर, ज्यांनी लोकसभेला तिकीट न मिळाल्याने शिंदेंना सोडलं होतं, त्यांनाच पुन्हा पक्षात घेऊन विधानसभेला संधी देण्याचं राजकारण होत आहे. 


शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या राजेंद्र गावित यांची पुन्हा शिवसेना शिंदे गटात पुन्हा घरवापसी होणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकांवेळी गावित यांना तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या गावितांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता विधानसभेला तिकीट मिळणार असल्याने गावितांचा पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होत आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत पालघरचे माजी आमदार विलास तरे हे देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. पालघर विधानसभेसाठी राजेंद्र गावित तर बोईसर विधानसभेसाठी विलास तरे यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे, हे दोन्ही नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी माहिती आहे.  


पालघर विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे सध्याचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या उमेदवारीवर सध्या टांगती तलवार आहे. कारण, शिवसेनेच्या पहिल्या यादीत श्रीनिवास वनगा यांना स्थान देण्यात आलं नाही. त्यातच, पालघर मधील दोन्ही जागा शिवसेना शिंदे गट आयात उमेदवारांना देणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. विशेष म्हणजे, बंड करतेवेळी गुजरातकडे जाताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचं कारण पुढे करून मार्गक्रमण केले होते. मात्र, त्याच आमदार वनगा यांचं तिकीट कापलं जातय, अशी चर्चाही मतदारसंघात जोर धरत आहे. 


हेही वाचा


राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात