Palghar Leopard Attack: गेल्या काही महिन्यांपासून मोखाडा (Mokhada) तालुक्यात बिबट्याच्या (Leopard) हल्ल्याच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. याच मालिकेत सोमवारी सकाळी खोच ग्रामपंचायत हद्दीत घडलेल्या नव्या घटनेत नऊ वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला. घराच्या कोपऱ्यात बसलेल्या मुलावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र कुटुंबीयांच्या वेळीच केलेल्या आरडाओरडेमुळे बिबट्या पसार झाला आणि चिमुकल्याचा जीव वाचला.

Continues below advertisement

पिंपळपाडा येथील संकेत सुनील भोये (वय 9) हा सोमवारी पहाटे सहा वाजता शेकोटी पेटवण्यासाठी घराबाहेर, घराच्या कोपऱ्यावर बसला होता. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कुंपणावरून उडी मारत संकेतवर झडप घालण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकाराने घरातील आजी आणि इतर सदस्य घाबरून गेले. त्यांनी तात्काळ आरडाओरड सुरू करताच बिबट्या मागे हटला आणि काही क्षणांत पळून गेला. त्यामुळे संकेतचा जीव थोडक्यात वाचला. पळताना त्याचा गुडगा जखमी झाला असला तरी गंभीर दुखापत टळली.

Palghar Leopard Attack: वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी

"संकेत रोजच्या प्रमाणे सकाळी शेकोटी पेटवण्यासाठी बाहेर आला होता. बिबट्याने त्याला पाहताच कुंपणावरून उडी मारून धाव घेतली. माझ्या आईसह घरातील सर्वांनी आरडाओरड केली, त्यामुळे बिबट्या पळून गेला. संकेतला कोणतीही मोठी इजा झाली नसली तरी या प्रकारामुळे आम्ही अत्यंत घाबरलो आहोत. वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी," अशी मागणी संकेतचे काका केशव भोये यांनी केली आहे.

Continues below advertisement

Palghar Leopard Attack: नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण

या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पशुधनावर होणारे बिबट्याचे हल्ले वाढले असून आता माणसांवरही हल्ल्याचे प्रयत्न होऊ लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. घटनास्थळावर जाऊन पाहणी करण्यात येणार असून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती वनक्षेत्रपालांनी दिली आहे.

Palghar Leopard Attack: काही दिवसांपूर्वीच विक्रमगडमध्येही बिबट्याचा चिमुकल्यावर हल्ला

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या 11 वर्षीय विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. विद्यार्थी मयंक विष्णु कुवरा (वय 11, इयत्ता 5 वी) हा संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर माळा पाडवीपाडा येथे परतत होता. शाळेतून घर चार किमी अंतरावर असल्याने तो नेहमीप्रमाणे जंगल रस्त्याने चालत जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. हल्ल्यात बिबट्याचे वार थेट मयंकच्या दप्तरावर झाल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला. मात्र नखांमुळे मयंकच्या हातावर खोल जखमा झाल्या होत्या. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर मयंकने आरडाओरड करत प्रतिकार केला. तर त्याच्यासोबत असलेल्या मुलाने दगडफेक केली. त्यानंतर जवळील नागरिक घटनास्थळी धावत येताच बिबट्या जंगलात पसार झाला होता.  

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Palghar Leopard Attack: बिबट्याने अंगावर झेप घेतली, धारदार नखं अंगात रुतली, पण चिमुकला मयंक कसा वाचला? सांगितला थरारक अनुभव