पालघर : राज्यातील महिलांच्या आरोग्यासाठी, गर्भवती महिला (Women) आणि बालसंगोपनासाठी सरकार योजना राबवते. मात्र, दुसरीकडे अद्यापही गर्भवती महिलांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागतो, गर्भवती महिलांच्या प्रसुतीसाठी ग्रामीण भागात, आदिवासी पाड्यात व्यवस्थाच नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होताना दिसून येतात. त्यातच, आता पालघर जिल्ह्याच्या मोखाडा (Palghar) तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका पाड्यावरली गर्भवती महिलेला चक्क घनदाट जंगलात सोडून रुग्णावाहिका चालक निघून गेल्याची चीड आणणारी घटना समोर घडली. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून संबंधित रुग्णवाहिका चालकावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील अति दुर्गम असलेल्या आमला गावातील प्रसूत महिलेला अर्धवट रस्त्यात सोडून रुग्णवाहिका गेल्याने प्रसूत महिलेच्या कुटुंबीयांनी बाळाला घेऊन दोन किलोमीटर पायपीट केल्याची ह्रदयद्रावक आणि तितकीच संतापजनक घटना घडली. प्रसूत महिला सविता बारात [ सासरचे नाव सविता बांबरे ] हिला बुधवार 19 नोव्हेंबर रोजी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर तिला काही कारणास्तव जव्हार कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले, तिची प्रसूती सुखरूप झाली. रविवार 24 नोव्हेंबरला तिला रुग्णवाहिका देऊन घरी पाठविण्यात आले. मात्र, रुग्णवाहिका चालकाने त्यांना गावापासून दोन किलोमीटर रस्त्यावर घनदाट जंगलाच्या ठिकाणी उतरवून ती रुग्णवाहिका निघून गेली.
प्रसूत महिला सविता बारात हिच्यासोबत आई व सासूबाई होत्या, त्यांना बाळाला व प्रसूत महिलेला दोन किलोमीटर पायपीट करावी लागली. या सर्व घटनेचा त्यांच्या कुटुंबाने संताप व्यक्त केला आहे. प्रसूत महिलेच्या जीवाला काही झाले असते तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. जव्हार मोखाड्यात सध्या बिबट्यांचा वावर आणि हल्ले वाढत असतानाच अशा पद्धतीने निर्जनस्थळी एका प्रसुती मातेसह तिच्या नवजात बालकाला सोडन रुग्णवाहिकेचा चालक निघून जातो हा प्रकार धक्कादायक आणि हादरवणारा असल्याने नागरिकांकडून सध्या संताप व्यक्त करण्यात येतोय. तसेच, संबंधित रुग्णावाहिका चालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद