Palghar Leopard Attack: पालघरच्या (Palghar) विक्रमगड (Vikramgad) तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयातील 11 वर्षीय मयंक विष्णू कुवरा याने मृत्यूच्या दाढेतून स्वतःला कसे वाचवले, याचा थरारक अनुभव सांगितला आहे. “आम्ही दोघं घरी जात होतो… अचानक समोरच बिबट्या दिसला. माझ्यावर झडप घातली…,” असे म्हणत मयंकने त्या भीषण घटनेचे वर्णन केले आहे. (Palghar Leopard Attack)
बिबट्याच्या हल्ल्याबाबत मयंकने सांगितले की, शाळा सुटली तेव्हा आम्ही दोघे जण जातो. तेव्हा समोरच बिबट्या दिसल्या. त्याने माझ्यावर हल्ला केला. सगळ्यांना दुपारीच माहिती मिळाली होती की परिसरात बिबट्या आलेला आहे. माझ्यावर हल्ला केला, त्याचे नखे मला लागली पण हल्ला माझ्या दप्तरावर झाला. आम्ही आरडाओरड केली त्यानंतर तिथे नागरिक आले आणि बिबट्या पसार झाला, असे त्याने म्हटले आहे.
Palghar Leopard Attack: नेमकं काय घडलं?
दरम्यान, मयंक विष्णु कुवरा (वय 11, इयत्ता 5 वी) हा संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर माळा पाडवीपाडा येथे परतत होता. शाळेतून घर चार किमी अंतरावर असल्याने तो नेहमीप्रमाणे जंगल रस्त्याने चालत जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. हल्ल्यात बिबट्याचे वार थेट मयंकच्या दप्तरावर झाल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला. मात्र नखांमुळे मयंकच्या हातावर खोल जखमा झाल्या. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर मयंकने आरडाओरड करत प्रतिकार केला. तर त्याच्यासोबत असलेल्या मुलाने दगडफेक केली. त्यानंतर जवळील नागरिक घटनास्थळी धावत येताच बिबट्या जंगलात पसार झाला. मयंकवर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. हातावरील खोल जखमांवर टाके घेतले गेल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Palghar Leopard Attack: परिसरात भीतीचे सावट कायम
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार वाढला आहे. काहींनी तर सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून सावध राहण्याचा इशाराही दिला होता. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी जंगलमार्गच वापरावा लागतो, त्यामुळे भीतीचे वातावरण अधिकच वाढले आहे. मयंकवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी वनविभागाला तातडीने कारवाईची मागणी केली आहे. शाळेजवळ आणि जंगल पट्ट्यात गस्त वाढवावी, विद्यार्थ्यांच्या मार्गावर सुरक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आणखी वाचा