Palghar Leopard Attack: पालघरच्या (Palghar) विक्रमगड (Vikramgad) तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयाचा 11 वर्षीय विद्यार्थी मयंक विष्णु कुवरा (Mayank Kuwara) मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावला आहे. शाळा सुटल्यानंतर घरी जाण्याच्या मार्गावर त्याच्यावर बिबट्याने (Leopard) झडप घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मयंकने आरडाओरडा केल्याने, त्याच्या मित्राच्या बिबट्यावर दगडफेकीने आणि आसपासच्या नागरिकांच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, या परिसरात अजूनही भीतीचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. (Palghar Leopard Attack)
Palghar Leopard Attack: घरी जाताना अचानक बिबट्याचा हल्ला
मयंक रोजप्रमाणे शाळा सुटल्यावर माळा पाडवीपाडा येथे घरी परतत होता. शाळा आणि घर यामधील चार किलोमीटरचे अंतर असून रस्ता जंगल मार्गातून जातो. मयंक घरी जात असताना अचानक बिबट्याने मयंकवर झडप घातली. हल्ला इतका अचानक होता की, मुलांना काही सुचण्याअगोदरच बिबट्याच्या नखांनी मयंकच्या हाताला खोलवर जखमा झाल्या.
Palghar Leopard Attack: दप्तराने वाचवला मयंकचा जीव
बिबट्याचे पहिले वार थेट मयंकच्या दप्तरावर बसले. त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात वाचला. पाठीवर घेतलेल्या दप्तराने ढाल बनत बिबट्याचा फटका झेलला आणि मुलाला गंभीर इजा टळली. मात्र, त्याच्या हातावर नखांचे खोल घाव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
Palghar Leopard Attack: आरडाओरडा, दगडफेक आणि नागरिकांची धाव
बिबट्याने अचानक हल्ला केल्याने मयंक आरडाओरड करू लागला. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या मुलाने तात्काळ धाडसाने बिबट्यावर दगडफेक केली. आवाज ऐकून जवळील नागरिक घटनास्थळी धावत पोहोचले. माणसांची चाहूल लागताच बिबट्या जंगलात पसार झाला. मुलांच्या तत्परता आणि धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला.
Palghar Leopard Attack: परिसरात भीतीचे वातावरण
दरम्यान, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मागील काही दिवसांपासून बिबट्या परिसरात फिरत असल्याची चर्चा होती. काही गावकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून सावधगिरीचा इशारा देखील दिला होता. तरीही मुलांना जंगलमार्गानेच शाळेत ये-जा करावी लागत असल्याने भीती वाढत चालली आहे.
Palghar Leopard Attack: जखमी मयंकवर उपचार सुरु
जखमी मयंकवर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, हातावरील खोल जखमांवर टाके घेण्यात आले आहेत. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाला तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. शाळा आणि जंगल पट्ट्यात गस्त वाढवावी, विद्यार्थ्यांच्या ये-जा मार्गावर सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तर बिबट्याच्या हल्ल्यातून स्वतःला वाचवत मित्रासह प्रतिकार करणाऱ्या मयंकच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा