Palghar Leopard Attack: पालघरच्या (Palghar) विक्रमगड (Vikramgad) तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या 11 वर्षीय विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला (Leopard Attack) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या तात्काळ धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली असून परिसरात या मुलांच्या धैर्याचे कौतुक होत आहे. (Palghar Leopard Attack)
याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यार्थी मयंक विष्णु कुवरा (वय 11, इयत्ता 5 वी) हा संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर माळा पाडवीपाडा येथे परतत होता. शाळेतून घर चार किमी अंतरावर असल्याने तो नेहमीप्रमाणे जंगल रस्त्याने चालत जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. हल्ल्यात बिबट्याचे वार थेट मयंकच्या दप्तरावर झाल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला. मात्र नखांमुळे मयंकच्या हातावर खोल जखमा झाल्या.
Palghar Leopard Attack: मयंककडून आरडाओरड करत प्रतिकार
अचानक झालेल्या हल्ल्यानंतर मयंकने आरडाओरड करत प्रतिकार केला. तर त्याच्यासोबत असलेल्या मुलाने दगडफेक केली. त्यानंतर जवळील नागरिक घटनास्थळी धावत येताच बिबट्या जंगलात पसार झाला. या परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याची चर्चा होती. गावकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून सावधगिरीचा इशारा दिला होता. तरीही शाळकरी मुले जंगलातूनच प्रवास करत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Palghar Leopard Attack: मयंकवर उपचार सुरु
जखमी मयंकवर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून खोल जखमेवर टाके घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. घटनेनंतर नागरिकांनी वनविभागाने तातडीने पावले उचलावीत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा परिसर आणि जंगल पट्ट्यात गस्त वाढवावी तसेच मुलांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, बिबट्याला पळवून लावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Nashik Leopard News: सिन्नरमध्ये बिबट्या जेरबंद
दरम्यान, नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील सोनेवाडी शिवारात गुरुवारी (दि.२०) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्याला पकडण्यासाठी चार दिवसांपूर्वी या भागात पिंजरा लावण्यात आला होता. बिबट्यास वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याची रवानगी मोहदरी येथील वनोद्यानात केली. सोनेवाडी येथील रुकसाना काजी यांच्या मालकीच्या गट नंबर 186 मध्ये दि. 16 नोव्हेंबर रोजी बिबट्या असल्याची तक्रार आल्याने पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजऱ्यात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. त्याचे वय अंदाजे सहा वर्षे असून, तो नर जातीचा असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा