Palghar: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Ahmedabad National Highway) पालघरमधील (Palghar) चिंचपाडा येथील अंडरग्राउंड ब्रिज धोकादायक झाला असून या ब्रिजला खालून मोठं भगदाड पडलं आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर स्थानिकांना ये-जा करण्यासाठी या ठिकाणी पूल तयार करण्यात आला असून या पुलाच्या खालील स्लॅबचा काही भाग सोमवारी (7 ऑगस्ट) कोसळून पडला. लवकरच पुलाच्या डागडुजी आणि दुरुस्तीचं काम हाती न घेतल्यास या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.


महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांना धोका


मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा सध्या जीवघेणा झाला असून आज पहाटेच्या सुमारास पालघरमधील चिंचपाडा येथील अंडरग्राउंड ब्रिजच्या स्लॅबचा काही भाग कोसळून खाली पडल्याने हा ब्रिज सध्या धोकादायक बनला आहे. सुदैवाने ही दुर्घटना घडली त्यावेळी ब्रिजखाली कोणतंही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली, परंतु या पुलामुळे महामार्गावरुन प्रवास करणारी वाहनं आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या ब्रिजसाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी सळ्या बाहेर दिसत असून या स्लॅबच्या काही भागाला तडे गेल्याने हा भाग कधीही कोसळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.


मुंबईहून गुजरातकडे जाणारा एक लेन बंद


मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दिवसाला हजारो वाहनं ये-जा करत असून यात अनेक अवजड वाहनांचाही समावेश आहे. मुंबईहून गुजरातकडे ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी हा प्रमुख मार्ग असून अवजड वाहनांमुळेही या पुलाला धोका निर्माण झाला आहे. कासा पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून या महामार्गावरील गुजरात कडे जाणाऱ्या वाहिनीवरील एक लेन बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गावर सध्या धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे. वारंवार हा महामार्ग धोकादायक ठरत असताना देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सदर ठेकेदार गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी स्थानिकांकडून करण्यात आला आहे.


टोल वसुली, मात्र रस्त्यांच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष


मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत चारोटी आणि खाणीवडे या दोन ठिकाणी टोल वसुली केली जात असली तरीसुद्धा या महामार्गाच्या दुरुस्तीकडे प्राधिकरणाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे, त्यामुळे हजारो वाहन चालक आणि प्रवाशांना या महामार्गावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांच्या स्थितीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.


हेही वाचा:


Palghar : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा; सात महिन्यांत 200 अपघात, 95 जणांचा बळी