पालघर : माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना रोज राज्यात घडत असल्याचं चित्र आहे. पालघरमध्ये अशीच एक घटना घडली असून त्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. खाऊचं आमिष दाखवून एका 60 वर्षांच्या नराधमाने आठ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चिमुकलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरिश्चंद्र गणपत अंभिरे असं त्या नराधमाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 


डहाणू पोलिस ठाणे अंतर्गत ही धक्कादायक घटना घडली आहे. सध्या चिमुकलीवर डहाणू मधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. 


या प्रकरणी डहाणू पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला 29 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी डहाणू पोलीस अधिक तपास करत आहेत. 


पोक्सो व्यतिरिक्त अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा


या घटनेनंतर परिसरातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे. पीडित चिमुकली ही आदिवासी समाजाची असून पोस्को व्यतिरिक्त अँट्रोसिटी अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी स्थानिक आदिवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. 


मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार


दिंडोशी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. एका 78 वर्षींय वृद्ध महिलेवर एका 20 वर्षांच्या युवकाने अत्याचार केल्याचं समोर आलं. या वृद्ध महिलेला विस्मरणाचा आजार असून त्याचा फायदा घेत या युवकाने तिच्यावर अत्याचार केल्याचं उघड झालं. घरातील सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आल्यानंतर युवकावर गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. 


पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर 20 वर्षांचा आरोपी प्रकाश मोरियाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64(1) आणि 332(B) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आणि न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


ही बातमी वाचा: