नालासोपारा, पालघर : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात (Nalasopara Arms Haul) जामिनावर सुटका झालेला आरोपी वैभव राऊत (Vaibhav Raut) याचे नालासोपारामध्ये (Nalasopara) वाजत, गाजत जल्लोषात स्वागत करण्यात आले. हिंदूत्ववादी कार्यकर्ते आणि नातलगांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले होतं.  वैभव राऊतच्या नालासोपारा पश्चिम (Nalasopara West) येथील भंडार आळी येथील त्याच्या घरासमोर रांगोळी काढण्यात आली होती.  फटक्याची आतीषबाजी, बेन्जोच्या तालावर नाचत गात जल्लोषात वैभव राऊतच स्वागत करण्यात आलं होते. या स्वागताचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहे. 


ऑगस्ट 2018 मध्ये एटीएसनं वैभव राऊतला नालासोपारा येथून अटक केली होती. वैभव राऊत हा सनातन संस्थेशी संबंधित आहे. नालासोपाऱ्यातील घरातून एटीएसनं स्फोटक पदार्थ जप्त केली होती. हिंदूराष्ट्र निर्माण करण्यासाठी देशाचं सार्वभौमत्व आणि अखंडता धोक्यात आणून दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप वैभव आणि  इतर आरोपींवर लावण्यात आला होता. जानेवारी 2023 मध्ये वैभव राऊतनं मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.  या प्रकरणातील अनेक सहआरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे. याप्रकरणातील खटला सध्या सुरू असून तो लवकर संपण्याची शक्यता नाही. त्यामुळे आपल्याला जामीन मंजूर करावा अशी विनंती वैभव राऊतनं आपल्या जामीन अर्जात केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरेच आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली. कोर्टानं ही याचिका स्वीकारत जामीन मंजूर करताना वैभव राऊतला खटल्याच्या सुनावणीस नियमित हजेरी आणि साक्षी पुराव्यांशी छेडछाड न करण्याचे निर्देश दिले आहेत. 


वैभव राऊतच्या घरातून काय सापडले?


वैभव राऊतच्या घरातून 20 जिवंत गावठी बॉंम्ब, 2 जिलेटिन कांड्या, 4 इलेक्ट्रिक डिटोनेटर्स, 22 नॉन ईलेक्ट्रिक डिटोनेटर्स, पॉईजन लिहिलेल्या एक लिटरच्या दोन बाटल्या तसेच वेगवेगळ्या स्फोटक पावडरची पाकिटे एटीएसला सापडली होती. 


6 हजार पानी आरोपपत्र


नालासोपारा शस्त्रसाठी प्रकरणी तपासयंत्रणेनं डिसेंबर 2018 मध्ये 6 हजार 842 पानांचं पहिलं दोषारोपपत्र मुंबई सत्र न्यायालयात सादर केलं होतं. ज्यात वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर, श्रीकांत पांगरकर, अविनाश पवार यांच्यासह एकूण 12 जणांचा समावेश होता. हे सर्वजण सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित होते. या सर्वांवर शस्त्रसाठा प्रतिबंधक कायदा, विस्फोटक पदार्थ कायदा आणि आयपीसीच्या गंभीर कलमांखाली आरोप लावण्यात आले होते.


काय आहे प्रकरण? 


नालासोपाऱ्यात वैभव राऊतच्या घरी अवैद्य शस्त्रसाठा हस्तगत केल्यानंतर वैभव राऊतसह सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर यांना अटक करण्यात आली होती. त्या नंतर दहशतवाद विरोधी पथकानं या प्रकरणात चौथा आरोपी म्हणून जालना येथून श्रीकांत पांगरकरला अटक केली होती. हिंदु दहशतवाद पसरवत असल्याच्या संशयाखाली अटक करण्यात आलेल्या या आरोपींना या संपूर्ण प्रकरणाच्या गंभीरतेची कल्पना होती. त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला शस्त्रसाठा आणि इतर साहित्य हे या प्रकरणी अधिक खोलात तपास करण्याची गरज असल्याचं त्यावेळी मुंबई सत्र न्यायालयानं मान्य केलं होतं.


आरोपींकडून मिळालेल्या माहीतीनुसार एटीएसनं नालासोपारा, पुणे आणि सोलापूर इथं छापेमारी केली होती. त्यात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून गावठी पिस्तुलं, गोळ्या इत्यादी शस्त्रसाठी जप्त करण्यात आला. प्रसाद देशपांडे नाव्याच्या व्यक्तीकडून या गोष्टी हस्तगत केल्या होत्या. तसेच पुण्यातील पर्वती इथून काही सीसीटिव्ही फुटेज, तीन वाहनांच्या नंबर प्लेट्स आणि सुधन्वा गोंधळेकरच्या ऑफिसमधून काही आक्षेपार्ह लिखाण साहित्यही हस्तगत करण्यात आलं होतं. 


अटकेच्या निषेधार्थ मोर्चा...


वैभव राऊत याला अटक करण्यात आल्यानंतर नालासोपारामध्ये सनातन संस्था, हिंदू जनजागृती समितीने काही राजकीय पक्षांच्या पाठिंब्यावर मोर्चा काढला होता. वैभव राऊत विरोधातील कारवाई चुकीची असल्याचा सूर या मोर्चात उमटला होता.