Diwali 2022 : येत्या 21 ऑक्टोबरपासून दिवाळीचा (Diwali 2022) सण सगळीकडे साजरा केला जाणार आहे. पाच दिवस दिवाळीचा सण साजरा करण्यात येतो त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण असते. तसेच या सणानिमित्त बाजारपेठाही सजल्या आहेत. ग्राहकांची देखील विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात लगबग पाहायला मिळतेय. गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाचे (Covid 19) सावट असल्याने बंद असलेले फटाका मार्केट पुन्हा एकदा गजबजले आहे. ठिकठिकाणी बाजारात फटाक्यांची दुकानं पाहायला मिळतायत. त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील वाडा येथील प्रसिद्ध असलेल्या फटाका मार्केटमध्ये पुन्हा एकदा फटाके प्रेमींनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. यावर्षी फटाक्यांच्या किंमतीत 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी नागरिकांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. 


नागरिकांचा खरेदीसाठी भरघोस प्रतिसाद


दिवाळी म्हटली की, फटाके हे आलेच. लहान मुलांपासून ते तरूणाई आणि वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच फटाक्यांचा मोह काही आवरत नाही. मात्र, मागील दोन वर्ष जगावर असलेल्या कोरोनाच्या संकटाने फटाक्यांवर निर्बंध आले होते. या सगळ्यामुळे नागरिकांना फटाक्यांसह दिवाळी साजरी करताना आली नाही. शिवाय याचा मोठा फटका फटाके व्यावसायिकांना बसलेला दिसून आला. यावर्षी मात्र, निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करता येणार असल्याने पुन्हा एकदा फटाक्यांच्या मार्केटमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी करायला सुरुवात केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाक्यांच्या किंमतीत तब्बल 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी मात्र, फटाके खरेदी करताना नागरिकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळतोय. 


मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधून नागरिकांची गर्दी 


वाडा येथील फटाका मार्केट पालघरसह ठाणे मुंबई नवी मुंबई कल्याण भिवंडी या भागात प्रसिद्ध असून चांगल्या प्रतीचे आणि स्वस्त मिळणारे फटाके यासाठी वाडा प्रसिद्ध आहे. म्हणून या वाडा फटाके मार्केटमध्ये ठाणे, मुंबई, नवी मुंबई या शहरांमधूनही ग्राहक फटाके खरेदी करण्यासाठी येत आहेत. 


कोरोनामुळे जगावर आलेलं संकट काही प्रमाणात कमी झालं आहे. त्यामुळे यंदा दिवाळी सण हा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे फटाक्यांच्या वाढलेल्या दराचा विचार न करता ग्राहक ही नवनवीन प्रकारच्या फटाक्यांची मोठी मागणी करत आहेत.


महत्वाच्या बातम्या : 


Dhanteras Diwali 2022 : दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच 'धनत्रयोदशी'; वाचा पूजा करण्याची योग्य पद्धत