Maharashtra Palghar News : पालघर (Palghar) जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा तालुके म्हटलं तर अनेक समस्यांनी ग्रासलेले तालुके. कुपोषण, बालमृत्यूसह पाणी टंचाई ही पाचवीलाच पुजलेली. आताही या तालुक्यांतील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या महिन्यापासून नाहीतर तब्बल फेब्रुवारीपासूनच या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. 


मोखाडा तालुक्याच्या मुख्यालयापासून 25 ते 30 किमी अंतरावर आसे ग्रामपंचायतमधील 250 घरांच्या 745 लोकवस्तीच्या भोवाडी गावाला फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यांना 4 किमी अंतरावर असलेल्या नदीतून खड्डा खोदून दूषित पाणी प्यावं लागत आहे. दिवस भराचं कामकाज सोडून येथील आदिवासी बांधवांना लहानग्यांसह कुटुंबासहित घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. परंतु, वेळेत पाणीपुरवठा विभागाचे टँकर उपलब्ध होत नाहीत. 2 महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर एप्रिल महिन्यात पाणी पुरवठा विभागाचे टँकर उपलब्ध होतात. परंतु वेळेवर टॅंकर येत नाही, दोन टँकरची आवश्यकता असताना अधूनमधून कसा बसा एक टँकर येत असल्याचे येथील गावकरी सांगतात. 




भोवाडी गावात पाणी टंचाईची ही पहिली वेळ नाही. तर या गावात फेब्रुवारीपासूनच पाणी टंचाई सुरू होते. यानंतर नदीवरून चार किमी अंतरावरून पाणी आणावं लागते. दिवसभर घरचे काम सोडून पाणी भरावे लागते. टॅंकर मात्र दोन महिन्यानंतर उपलब्ध होतो. येथे दोन टँकरची आवश्यकता असताना एकच टॅंकर अधूनधून येतो. यामुळे गावाची तहान देखील भागत नाही. यामुळे घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट कायम आहे. आम्हाला दिवस रात्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. टॅंकर आला नाही, तर आताही नदिवरूनच पाणी आणावं लागतं. यामुळे आमच्याकडे कुणी तरी लक्ष देऊन आमच्या गावात सक्षम नळ पाणी पुरवठा योजना राबवावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 


मोखाडाची अवस्था, 'धरण उशाला, कोरड घशाला'


पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम डोंगराळ असलेल्या मोखाडा तालुक्यात फेब्रुवारीच्या मध्यातच पाणी टंचाईला सुरुवात होते.आजघडीला मोखाडा तालुक्यात 60 गावपाड्यांत पाणीबाणीची परिस्थितीत निर्माण झाली आहे. 19 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. परंतु येथे मुबलक पाणीसाठा असूनही नियोजनाअभावी 'धरण उशाला अन् कोरड घशाला' अशी अवस्था आहे. मोखाडा तालुक्यात मोठी मोठी पाच धरणं असताना दरवर्षीच आदिवासी बांधवांच्या पाचवीला पुजलेल्या पाणी टंचाईचा छापा अद्यापही पुसला गेलेला नाही. जव्हार मोखाडा तालुक्यात जवळपास 80 गाव टंचाईग्रस्त असून या पुढे या कृत्रिम टंचाईवर उपाय योजना झाल्या नाही तर आंदोलना शिवाय पर्याय नाही, असं गावकरी म्हणतात.