Palghar News : पालघर (Palghar) जिल्हा हा विविधतेने नटलेला असून सागरी, नागरी आणि डोंगरी अशा तीन विभागात विभागलेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्याला नैसर्गिक साधन संपत्ती पूर्वापार लाभली असून जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा तसेच डहाणू तालुक्यातील नैसर्गिक, भौगोलिक रचनेनुसार डोंगर-दऱ्यात मोहाचे झाड आपोआप वाढते. मोहाला (Mahua) कल्पवृक्ष असे देखील संबोधले जाते. पालघर येथील आदिवासी मोह फुलांच्या मदतीने मद्य तयार करतात. परंतु नुकताच शासनाने मोहाच्या फुलांची दारू करण्याची परवानगी दिल्याने आदिवासी नागरिकांना एक उत्तम रोजगार उपलब्ध झाला आहे. परंतु ही फुले नेमकी द्यायची कुठे असा संभ्रम कायम आहे. काही नागरिक शहरातील बाजारात मोह फुले आणून त्या बदल्यात जीवनावश्यक वस्तू खरेदी करत असल्याने मोह फुले जमवून व्यावसायिक जास्त नफा घेत असल्याचे चित्र आहे.
मोह फुलं विकायची कुठे?
मोहाच्या फुलांची वाहतूक, साठवणूक आणि त्यानंतर आता मोह फुलापासून तयार झालेली दारु अधिकृतरीत्या विक्री करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी तर दिली. परंतु संकलित होणारे मोह फुलं नेमकी विकायची कुठे असा प्रश्न आदिवासी नागरिकांसमोर आहे. मोह फुलं खरेदी करणारे शासकीय केंद्रच नसल्याने खासगी व्यापाऱ्यांनाच मोहाच्या फुलांची विक्री करावी लागणार आहे. यात संकलन करणाऱ्या गरजूंपेक्षा व्यापाऱ्यानांच अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील जंगलातून मोठ्या मेहनतीने मोह फुले जमवली जात आहेत. परंतु ही फुले कुठे विकायची हे माहित नसल्याने काही व्यापारी मोह फुले घेऊन त्या बदल्यात जीवनावश्यक वस्तू देत आहेत. त्यामुळे मोह फुलांपासून होणारा फायदा व्यावसायिक घेत आहेत.
मोह फुलाची वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या किंमतीत विक्री केली जाते. सध्या 60 ते 70 रुपये प्रतिकिलो वाळलेले मोह फूल खासगी दुकानदार तसेच काही किरकोळ व्यापारी खरेदी करत आहेत. परंतु वेगवेगळ्या भागात 40 ते 50 रुपयांपर्यंत सध्या प्रतिकिलो भाव आहे. शेतीतून उत्पादित मालाला शासनाकडून आधारभूत किंमत निश्चित केली जाते. परंतु मोह फुलं वनोपज असल्याने आधारभूत किंमत अद्यापतरी शासनाने निश्चित केली नाही. खुल्या बाजारात ज्या भावात मोह फुलाची विक्री केली जाते. त्याच किंमतीत मोहाची खरेदी-विक्री होते.
मोह फुलांचा सर्वाधिक वापर दारुसाठी
जव्हार तालुक्यात जंगलासह गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर मोहाची झाडे दिसून येतात. शेतकऱ्यांसह अन्य नागरिकही मोह फुलाचे संकलन मार्च आणि एप्रिल महिन्यात करतात. जवळपास एक महिना मोह फुलांचं संकलन होते. बरेच जण मोह फुलाचा वापर जनावरांच्या खाद्यासाठी करतात. तर बहुतांश जण मोह फुलाची विक्री दारु गाळणाऱ्या अवैध विक्रेत्यांकडे करतात. त्यामुळे जिल्ह्यात मोह फुलाचा सर्वाधिक वापर दारु गाळण्यासाठी केला जातो.