Palghar Crime News: पालघरच्या (Palghar News) नागाझरीत ज्वेलर्सच्या दुकानातील सोनं आणि चांदीचे दागिने घरी घेऊन जात असलेल्या सराफा व्यापाऱ्याला बंदुकीच्या धाकानं लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. एवढंच नाहीतर निर्मनुष ठिकाणी दोघांनी सराफा व्यापाऱ्यावर बंदुकीतून गोळ्याही झाडल्या. परंतु, सराफा व्यापाऱ्यानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे थोडक्यात अनर्थ टळला. त्यानंतर व्यापाऱ्यानं आरडाओरडा केल्यानं चोरे घटनास्थळावरुन फरार झाले. दरम्यान, मनोर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. 


ज्वेलर्सच्या दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने घरी घेऊन जात असलेल्या सराफाला बंदुकीच्या धाकानं लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न दोन चोरट्यांकडून करण्यात आला. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नागझरी नाक्यापासून नागझरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील निर्मनुष्य ठिकाणी दोघांनी सराफाला लुटण्याच्या उद्देशाने बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या, परंतु प्रसंगावधान राखत सराफ खाली वाकल्यानं थोडक्यात बचावला. बंदुकीतून गोळ्या झाल्यानंतर घाबरलेल्या सराफा व्यापाऱ्यानं आरडाओरडा केला आणि त्यानंतर चोरटे घटनास्थळावरून पळून गेले. घटनास्थळी पोलिसांचं पथक दाखल झालं असून मनोर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर पद्धतीनं तपास सुरू करण्यात आला आहे.


चार वर्षांपूर्वी नागझरी नाक्यावरील दुर्वांकुर ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाल्यानं ज्वेलर्सचे मालक भाईदास कंडी (वय 47) दररोज त्यांचं दुकान बंद करताना दुकानातील सोनं चांदीचे दागिने घेऊन घरी जात होते. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुचाकीवरून दुकानातील दागिने घेऊन नागझरी गावातील पवन विहार सोसायटीमध्ये जात होते. नागझरी नाका ते नागझरी गावा दरम्यानच्या निर्मनुष्य जागेत दबा धरून बसलेल्या दोघांनी दागिने लुटण्याच्या उद्देशानं त्यांच्या दिशेनं बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या, परंतु प्रसंगावधान राखल्यानं बंदुकीच्या गोळ्या भाईदास कंडी यांना लागल्या नाही.


लाखो रुपयांचे दागिने सोबत असताना बंदुकीच्या गोळ्या झाडल्यानं घाबरलेल्या भाईदास कंडी यांनी आरडाओरडा सुरू केला, नागझरी नाका नजीक असल्यानं गर्दी होण्याच्या भीतीनं चोरांनी अंधाराचा फायदा घेत उंच वाढलेल्या गवतातून पळ काढला.


घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळा वरून बंदुकीच्या गोळ्यांच्या दोन रिकाम्या पुंगळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. घटनास्थळा वरून पसार झालेल्या चोरांना पकडण्यासाठी चिल्हार बोईसर रस्त्यावर नाकाबंदी लावण्यात आली आहे. दरम्यान, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळाला भेट देत मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सतीश शिवरकर यांना तपासाबाबत मार्गदर्शन केलं.


दरम्यान, दुर्वांकुर ज्वेलर्समध्ये चार वर्षांपूर्वी चोरी झाली होती. 05 डिसेंबर 2019  पहाटेच्या वेळी झालेल्या चोरीत दुकानाच्या छताचे पत्रे फोडून चोरट्यांनी दोन किलो चांदीचे दागिने लांबवले होते.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'स्वच्छता हीच सेवा' उपक्रमादरम्यान रायगड किनाऱ्यावर सापडलं चरस; पोलिसांकडून 8 पाकिटं जप्त