पालघर : पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) वैतरणा स्थानकावरील (Vaitarna Station) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या अहमदाबाद (Ahemdabad) पॅसेंजर रेल्वेचा अपघात थोडक्यात टळला आहे. ही रेल्वे वैतरणा स्थानकावरुन गाडी सुटताना अचानक गाडीचे इंजिन (Railway Engine) रेल्वेच्या डब्ब्यांपासून वेगळे झाले. यामुळे स्थानकावरील प्रवाशांनी एकच गोंधळ सुरु केला. दरम्यान यामुळे पश्चिम रेल्वेचा निष्काळजीपणा सातत्याने समोर येत असल्याचं म्हटलं जात आहे. 


दरम्यान ही बाब लक्षात येताच वैतरणा स्थानकावरील रेल्वे कर्मचारी आणि पॅसेंजरच्या लोको पायलट यांनी हे इंजिन रेल्वेच्या डब्यांना पुन्हा जोडले. त्यानंतर ही रेल्वे पुन्हा पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली. पण अद्यापही यामगचं कारणं समोर आलेलं नाही. तरीही पश्चिम रेल्वेकडून दुर्लक्ष झाल्याचं यावेळी म्हटलं जात आहे. तर यामुळे पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. 


नेमकं काय घडलं?


मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने अहमदाबाद पॅसेंजर ही रेल्वे रवाना झाली होती. नेहमीप्रमाणे तिने दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकावर थांबा घेतला. थांबा घेतल्यानंतर ही रेल्वे पुढच्या प्रवासाला रवाना झाली. पंरतु तेवढ्यातच या रेल्वेचं इंजिन रेल्वेच्या डब्ब्यांपासून वेगळं झालं. ही बाब स्थानकावरील प्रवाशांच्या लक्षात आली आणि स्थानकावर एकच गोंधळ सुरु झाला. 


स्थानकावर प्रवाशांचा गोंधळ


दरम्यान इंजिन वेगळं झाल्याचं पहिल्यांदा स्थानकावरील प्रवाशांचा लक्षात आलं. त्यानंतर गाडीतील प्रवाश्यांनी देखील आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे इंजिन पुन्हा गाडीला जोडण्यासाठी अर्धा ते पाऊण तासांचा अवधी लागला. त्यानंतर हे इंजिन गाडीला जोडण्यात आले. तर इंजिन जोडल्यानंतर गाडीतील प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. 


सुदैवाने अपघात टळला


दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या रेल्वेच्या लोको पायलट आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे इंजिन पुन्हा रेल्वेला जोडले. यामुळे मोठा अपघात अगदी थोडक्यासाठी टळला. तर कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे कोणताही जीवितहानी झाली नाही. तसेच कोणत्याही प्रकारची दुखापत देखील झाली नाही. पंरतु जर गाडी वेगात असतान हा प्रकार घडला असता तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. 


त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी सध्या प्रवाश्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत याची देखील काळजी पश्चिम रेल्वेने घेणे आवश्यक असल्याचं म्हटलं जात आहे. 


हेही वाचा : 


Rs. 2000 notes : मोठी बातमी! दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली