Palghar News : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. स्वातंत्र्याचं 75 वं वर्ष अमृत महोत्सवी वर्ष (75th Year of Independence Day) म्हणून देशात धुमधडाक्यात साजरे केले जात आहे. परंतु पालघर (Palghar) जिल्ह्याच्या आदिवासी भागात आजही रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, रोजगार आणि निवारा या प्राथमिक मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे येथील आदिवासी बांधव (Tribal) अजूनही पारतंत्र्याचे जीवन जगत आहेत. अमृत महोत्सव साजरा करताना "हर घर तिरंगा, घर घर तिरंगा" अशी हाक देत, प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मात्र, पालघर जिल्ह्यात सरकारी आकडेवारीनुसार आजही सुमारे 12 हजार कुटुंब बेघर आहेत. या बेघर कुटुंबांनी "हर घर तिरंगा"ची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासनालाच सवाल केला आहे की "साहेब तुम्हीच बोला आम्ही झेंडा कुठे लावू?" 




पालघर जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये आजही रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य गावापर्यंत पोहोचलेले नाहीत. रस्ता नसल्याने अनेक भागातील रुग्णांना डोली करुन पायपीट करत दवाखान्यात यावे लागते आहे. या प्रवासात शेकडो रुग्णांनी जीव गमावले आहेत. वेळेवर रुग्ण सेवा न मिळाल्याने शेकडोंचा मृत्यू झाला आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. रोजगाराअभावी प्रतिवर्षी शहराकडे स्थलांतर करावे लागते आहे. तर आजही हजारो नागरिक बेघर आहेत. एकीकडे बुलेट ट्रेन, डिजिटल इंडिया आणि एअर अॅम्बुलन्सचा डांगोरा पिटला जात आहे. तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ग्रामीण भागातील नागरिक पारतंत्र्याचे जीवन जगत आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या निवडणुकीत 2022 पर्यंत एकही कुटुंब बेघर राहणार नाही, प्रत्येक कुटुंबाला पक्के घर मिळणार असल्याची घोषणा केली होती. त्याचा पुनरुच्चारही अनेकदा केला आहे. असे असताना आजमितीस पालघर जिल्ह्यात सुमारे 11 हजार 775 कुटुंब बेघर आहेत. त्यांना घरकुले मंजूर झाले आहेत मात्र, बांधकाम झालेले नाहीत. पंतप्रधान आवास, शबरी आवास, रमाई आवास आणि आदिम आवास योजनेंतर्गत बेघर कुटुंबाना घरकुल योजना राबवली जाते आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी घरकुलांचा शासनाकडून ईष्टांक दिला जातो. त्यानुसार सर्व्हेक्षण केले जाते. पालघर जिल्ह्यात या मंजूर आणि अपूर्ण घरकुलांव्यतिरिक्त आजही आदिम जमातीसह हजारो आदिवासी कुटुंब बेघर असल्याचे भीषण वास्तव आहे. त्यामुळे पंतप्रधानांचे प्रत्येक बेघर कुटुंबाला पक्के घर देण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे. 




पंतप्रधानांनी अमृत महोत्सवी वर्षात "हर घर तिरंगा, घर घर तिरंगा" अशी हाक देत प्रत्येक घरावर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान, स्वतंत्र भारताचा तिरंगा झेंडा लावण्याचे आवाहन केले आहे. तसेच तिरंगा झेंड्याचा अपमान होऊ नये म्हणून त्याची विशेष काळजी घेऊन, 15 ऑगस्टला संध्याकाळी झेंडा खाली उतरवून त्याची व्यवस्थितपणे घडी करुन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मागील वर्षात घरकुलांचा अखेरचा हफ्ता (अनुदान) मिळालेले नसल्याने अनेक घरकुले अपूर्णावस्थेत आहेत. अनेकांना मंजुरीही मिळाली नसल्याचे वास्तव आहे. बेघर कुटुंबाना घरेच नसल्याने, त्यांनी झेंड्याची काय काळजी घ्यायची आणि झेंडा कुठे फडकवायचा असा प्रश्न उभा ठाकला असून "साहेब सांगा ना, झेंडा कुठे लावू?" असा संतप्त सवाल बेघर कुटुंबांनी केला आहे. 


प्रतिक्रिया
मुळातच पालघर जिल्ह्यात हजारो कुटुंब स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात बेघर आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या देशाचा तिरंगा झेंडा कुठे लावायचा हा मोठा प्रश्न आहे. प्रत्येकाच्या मनात तिरंगा झेंड्याचा अभिमान आहे. गवताच्या झोपडीवर तिरंगा लावला तर त्याचा अपमान झाल्यास आमच्या आदिवासी बांधवांना दोषी ठरवू नका. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागात प्राथमिक सुविधा आणि पक्के घरे बांधून देणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  वैदेही वाढाण यांनी दिली आहे. 


* पालघर जिल्ह्यातील तालुका निहाय बेघर कुटुंबांना मंजूर आणि अपुर्ण घरकुल संख्या.......


1) पंतप्रधान आवास योजना


डहाणू - 2148
जव्हार - 1556
मोखाडा - 889
पालघर - 872
तलासरी - 848
वसई - 235
विक्रमगड - 1413
वाडा - 1300
--------------
एकूण - 9261



2) रमाई आवास योजना


डहाणू - 9
जव्हार - 3
मोखाडा - 25
पालघर - 32
तलासरी - 8
वसई - 11
विक्रमगड - 0
वाडा - 21
--------------
एकूण - 109


3) शबरी आवास घरकुल योजना


डहाणू - 495
जव्हार - 234
मोखाडा - 121
पालघर - 244
तलासरी - 278
वसई - 145
विक्रमगड - 225
वाडा - 129
--------------
एकूण - 1871


4) आदिम आवास घरकुल योजना


डहाणू - 79
जव्हार - 83
मोखाडा - 116
पालघर - 49
तलासरी - 35
वसई - 45
विक्रमगड - 60
वाडा - 67
--------------
एकूण - 534