Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय. सुरक्षा यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली जात आहे. याचदरम्यान सहा संशयित चेन्नईहून विमानाने श्रीलंकेत पोहचल्याची माहिती समोर आली होती. यानंतर शनिवारी  (03 मे 2025) दुपारी कोलंबो विमानतळावर मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबविण्यात आली.

Continues below advertisement

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, श्रीलंकेच्या एअरलाइन्सने सांगितले की, फ्लाइट क्रमांक UL122 सकाळी 11.59 वाजता बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली. पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, भारतीय अधिकाऱ्यांनी श्रीलंकेला इशारा दिला होता की, विमानात पहलगामचे सहा संशयित होते. पहलगाममधील संशयित दहशतवादी श्रीलंकेच्या एअरलाइन्सच्या विमानाने कोलंबोला पोहोचल्याचा अंदाज भारतीय अधिकाऱ्यांनी श्रीलंकेकडे व्यक्त केला. त्यानंतर तात्काळ श्रीलंकेकडून विमानतळावर शोध मोहीम राबवली गेली.

एकही संशयित सापडला नाही-

स्थानिक वृत्तांनुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर श्रीलंका पोलिस, श्रीलंका हवाई दल आणि विमानतळ सुरक्षा युनिट्सने संयुक्तपणे शोध मोहीम राबवली. पण कोणताही संशयित सापडला नाही. चेन्नई एरिया कंट्रोल सेंटरकडून अलर्ट मिळाल्याचे एअरलाइनने म्हटले आहे. श्रीलंकेच्या एअरलाइन्सने सांगितले की, कोलंबोमध्ये आगमन झाल्यानंतर विमानाची कसून तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली.

Continues below advertisement

भारताची पाकिस्तानविरुद्ध कारवाई-

देशातील प्रमुख दहशतवाद विरोधी संस्था असलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध तात्काळ कारवाई केली आणि सिंधू पाणी करार स्थगित केला. याशिवाय पाकिस्तानातून येणाऱ्या आयात आणि पार्सलवरही बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसाही रद्द केले आहेत. प्रत्युत्तरादाखल, पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार रद्द करण्याची धमकी दिली आहे, ज्यामध्ये शिमला कराराचाही समावेश आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी नरेंद्र मोदींची घेतली भेट-

जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.  बैठकीत पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात विस्ताराने चर्चा झाली. पहलगाम हल्ल्यानंतर ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी जम्मू कश्मीर सरकार आणि नॅशल कॉन्फरन्सकडून केंद्र सरकारला जे सहकार्य अपेक्षित आहे ते सगळं सहकार्य करण्यास तयार असल्याचं ओमर अब्दुल्लांनी सांगितलं. तसंच पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेच्या मुद्दांवर नॅशनल कॉन्फरन्स केंद्र सरकारच्या पाठीशी असल्याचंही ओमर अब्दुल्लांनी स्पष्ट केलं. अब्दुल्लांच्या भेटीनंतर लगेचच नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठीही पंतप्रधानांच्या भेटीला आले होते. मात्र पंतप्रधान आणि नौदल प्रमुखांमधील चर्चेचा विषय अद्याप स्पष्ट झालेला नाही. 

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack: भारताने तो निर्णय घेतल्यास आम्ही लगेच हल्ला करणार; पाकिस्तानचा थयथयाट, पुन्हा पोकळ धमकी

Pahalgam Terror Attack मोठी बातमी: पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अद्याप काश्मीरमध्येच; जंगलात रस्ते शोधण्यासाठी त्या मोबाईल अ‍ॅपचा वापर