Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध पाच मोठे निर्णय घेतले. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांनी पुढील 48 तासांत भारत सोडावा, असे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. तसेच नवी दिल्लीमधील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. मात्र पाकिस्तानी उच्च आयोगातील अधिकाऱ्यांचा वाघा बॉर्डरवरूनच जाण्याचा अट्टहास असल्याची माहिती समोर आली आहे. 

पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे. ज्यांनी वैध मार्गाने अटारी सीमा ओलांडली आहे, ते 1 मे 2025 पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या भारताकडून वाघा बॉर्डरवरील येणे-जाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यानंतरही पाकिस्तानी उच्च आयोगातील अधिकाऱ्यांचा वाघा बॉर्डरवरूनच जाण्याचा अट्टहास करत आहे. पाकिस्तानने भारताकडून वाघा बॉर्डरवरून स्वतःच्या अधिकाऱ्यांना जाण्यासाठी भारताकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे भारताकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लष्कराच्या कार्यक्रमात शाहबाज शरीफ यांच्या बढाया-

खाण्यापिण्याचे वांधे असलेल्या पाकिस्तानकडून भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीनं धमक्या दिल्या जात आहे. पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांच्या बेताल वक्तव्यातून पाकिस्तानची बेचैनी दिसून येत आहे. सिंधू नदीचं पाणी अडवल्यामुळं पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला जाणार असल्यानं पाकिस्तानी नेते अशी वक्तव्यं करत आहेत. भारतानं पाणी अडवलं तर संपूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देऊ, असं पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले आहे. 

वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय-

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारची एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्ताविरोधात 5 मोठे निर्णय घेत 5 तगडे धक्के पाकिस्तानला देण्यात आले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिंधू जल करारावर स्थगिती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द करण्यात येत आहे. तसेच, भारतातील पाकिस्तान दुतावासाच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचा निर्णय या बैठकीत झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानची व्यापाराच्या दृष्टीने कोंडी करण्याची रणनीती भारताने आखली असून आजच्या बैठकीतील निर्णयाचा दूरगामी परिणाम भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर होणार आहे. 

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack: अटारी-वाघा बॉर्डरवर गर्दी; आतापर्यंत किती पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडला?, आकडेवारी आली समोर