Leopard Attack : नाशिकच्या (Nashik News) दिंडोरी (Dindori) तालुक्यातील वनारवाडी शिवारात घास कापण्यासाठी गेलेल्या पायल राजेंद्र चव्हाण या २० वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात (Leopard Attack) मृत्यू झाला. पायल चव्हाण ही मविप्र महाविद्यालयात शिक्षण घेत होती. अभ्यासात हुशार असलेल्या पायल चव्हाणच्या दुर्देवी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. तर या परिसरात अनेकवेळा बिबट्याचा मुक्तसंचार दिसून आला आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी सातत्याने केली आहे. पण, त्याकडे वनविभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक-कळवण रस्त्याजवळ वाघाड कॅनॉललगत असलेल्या राजेंद्र चव्हाण यांच्या वस्तीवर त्यांची मुलगी पायल ही सायंकाळी गुरांना घास कापण्यासाठी गेली होती. यावेळी बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. नातेवाइकांनी तातडीने धाव घेत बिबट्याला पिटाळून लावले. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात पायल गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

नागरिकांचा वनविभागावर रोष

या घटनेनंतर नागरिकांनी हळहळ व्यक्त करत वनविभागावर रोष व्यक्त केला आहे. परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत जनावरांवर हल्ले होत आहे. काही महिन्यापूर्वी गुराखी मुलाचा हल्ल्यात मृत्यू झाला होता. मात्र वनविभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वनविभागाने पिंजरे लावत बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

मनमाडला बिबट्या आढळल्याने नागरिक भयभीत

मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मानवी वसाहतीत असलेल्या शीख मळ्यात शिरलेल्या बिबट्याला बन विभागाने जेरबंद केल्याच्या घटनेला चार दिवस उलट नाही तोच याचं मळ्यात दुसरा बिबट्या शिरल्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या मळ्यात शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आला आहे. दरम्यान, या अगोदर निफाड, येवला, चांदवड, नांदगाव या भागात बिबटे आढळून आले आहेत. मात्र मनमाड शहरात प्रथमच बिबट्या शिरला असून शहराजवळ घनदाट जंगल नसताना बिबटे कुठून आले? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.  इतर भागातून बिबट्यांना पकडल्यानंतर त्यांना मनमाडच्या हद्दीत सोडण्यात येत तर नाही ना? अशी चर्चा जनतेत सुरू झाली आहे. 

आणखी वाचा 

मोठी बातमी : नाशिक दगडफेकीतील आरोपी समीर पठाणचा जुगार अड्डा उद्ध्वस्त, आरोपींच्या जामिनासाठी खंडणीच्या पैशाचा वापर झाल्याचा संशय