Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध पाच मोठे निर्णय घेतले. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांनी पुढील 48 तासांत भारत सोडावा, असे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. तसेच कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारतात प्रवेश मिळणार नाही, असा निर्णयही घेण्यात आला. त्यानंतर एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने देश सोडण्यासाठी 48 तासांची मुदत दिल्यानंतर पंजाबमधील अमृतसरमधील अटारी-वाघा सीमा चेकपोस्ट मार्गाने एकूण 191 पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडला आहे. तर पाकिस्तानला गेलेले एकूण 287 भारतीय नागरिकही मायदेशात परतले असल्याची माहिती समोर आली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराचे जवान अॅक्शन मोडमध्ये-
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराचे जवान अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. काश्मीरच्या बांदिपोरा भागात कुलनार इथे चकमकीत एक दहशतवादी ठार मारण्यात आला. तर दोन सैनिक जखमी झालेत. परिसराला वेढा घालून अजूनही शोध मोहिम सुरू आहे. काश्मीरच्या शोपियान आणि पहलगाममध्ये घरांची झडती सुरू आहे. शेकडो संशयित ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
भारताचे पाकिस्तानला 5 तगडे धक्के-
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारची एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्ताविरोधात 5 मोठे निर्णय घेत 5 तगडे धक्के पाकिस्तानला देण्यात आले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिंधू जल करारावर स्थगिती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द करण्यात येत आहे. तसेच, भारतातील पाकिस्तान दुतावासाच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचा निर्णय या बैठकीत झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानची व्यापाराच्या दृष्टीने कोंडी करण्याची रणनीती भारताने आखली असून आजच्या बैठकीतील निर्णयाचा दूरगामी परिणाम भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर होणार आहे.
शत्रूनं विचारही केला नसेल असा धडा त्यांना शिकवू- पंतप्रधान मोदी
काश्मीरच्या पहलगाममधला भ्याड हल्ला हा फक्त पर्यटकांवर झालेला हल्ला नव्हता. तर तो देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला हा हल्ला होता. त्यामुळे या हल्ल्याला भारताकडून काय उत्तर दिलं जाणार याची उत्सुकता देशवासियांना आहे. तर हल्ल्याच्या तिसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आश्वस्त केलं. शत्रूनं विचारही केला नसेल असा धडा त्यांना शिकवू असा निर्धार नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.