मुंबई : शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे वयाच्या 90 व्या वर्षी मुंबईतील वांद्रे येथील घरात निधन झाले. सुमारे 15 वर्षांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आला झाला होता, तेव्हापासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज दुपारी 12 ते 12.15 दरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती उस्ताद मुस्तका खान यांचा मुलगा रब्बानी मुस्तान खान यांनी दिली.
उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना 1991 मध्ये पद्मश्री, 2006 मध्ये पद्मभूषण आणि 2018 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही देण्यात आला आहे. सायंकाळी साडेसात वाजता सांताक्रूझ दफनभूमीत त्यांचे अंत्यदर्शन होणार आहे.
गुलाम मुस्तफा खान हे रामपूर-सहसवान घराण्यातील आहेत, 1931 साली बदायूमध्ये त्यांचा जन्म झाला. आपल्या प्रतिभेने, कलेने त्यांनी देश-विदेशात उत्तर प्रदेशचे नाव पोहोचवले. गुलाम मुस्तफा यांना 1991 मध्ये पद्मश्री, 2003 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 2006 मध्ये पद्मभूषण आणि 2018 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुलाम मुस्तफा खान यांनी अगदी लहान वयातच गायला सुरुवात केली होती.
त्यांचे वडील उस्ताद वारिस हुसेन खान यांनी वयाच्या दुसऱ्याच वर्षी त्यांना संगीत शिकवायला सुरुवात केली. जेव्हा ते आठ वर्षांचे होते तेव्हा ते जन्माष्टमीच्या कार्यक्रमात पहिल्यांदा गायले. पार्श्वगायक म्हणून त्यांनी पहिल्यांदा एका मराठी चित्रपटासाठी गाणं गायलं. गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी सर्व चकीत झाले होते कारण हे गाणं पहिल्याच प्रयत्नात रेकॉर्ड केलं गेलं आणि संगीत दिग्दर्शकांनाही आश्चर्य वाटले की पहिल्यांदा पार्श्वगायन करणारा एखादा गायक इतका छान कसा गाऊ शकतो!
मुस्तफा खान काही गुजराती आणि हिंदी चित्रपटांसाठीही गायले, परंतु त्यांचा पहिला छंद नेहमी शास्त्रीय गायन होता. उस्ताद खान म्हणत की, “मला चित्रपटात गाण्याच्या अनेक ऑफर मिळाल्या पण मी पारंपारिक कलाकार आहे. माझ्या पूर्वजांनी आपले जीवन विकसित करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केलं, ती परंपरा कायम ठेवणं माझं कर्तव्य आहे.” कदाचित हेच कारण आहे की शास्त्रीय संगीतकार म्हणून पहिल्यांदा रेकॉर्डिंग केल्याबद्दल प्रख्यात तबला वादक उस्ताद जाकिर हुसेन यांनी मुस्तफा यांचं कौतुक केलं. गुलाम मुस्तफा खान यांनी 70 हून अधिक माहितीपट चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. त्यापैकी अनेकांना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.