नागपूर : अतिवृष्टिमुळे डेंग्यू व इतर किटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. रोगांवर नियंत्रणासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. जनजागृती, घरोघरी सर्वेक्षण, औषध फवारणी, धूर फवारणी, कुलरमध्ये औषधी टाकणे, गप्पीमासे सोडणे या सर्व उपाययोजना नियमितपणे मनपातर्फे करण्यात येत आहेत. मात्र यानंतरही काही भागात डेंग्यूच्या रुग्णांची नोंद होते आहे किंवा लारवा आढळतो आहे. अशा स्थितीत प्रत्येक नागरिकाने परिसरात व घरी स्वच्छता पाळणे आवश्यक आहे तसेच डेंग्यू सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधून औषधोपचार करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागामार्फत करण्यात आले आहे.


साठविलेल्या पाण्यामुळे होतो डेंग्यू


डेंग्यू हा आजार डेंगी विषाणूमुळे होतो व त्याचा प्रसार एडिस इजिप्टाय नामक मादी डासाच्या चावल्यामुळे होतो. साठविलेल्या किंवा साठलेल्या पाण्यात भंगार साहित्य जसे - टायर, नारळाच्या करवंट्या, रिकामे डबे, पाण्याचे टाके, फ्रिज मागील पाण्याचे ट्रे, कुंडया, कुलर, ड्रेनेजच्या जाळया, ई. ठिकाणी या डासाची उत्पत्ती होते. त्यामुळे नागरिकांनी निरोपयोगी सामानाची विल्हेवाट लावावी. पाणी वाहते करावे, आठवडयातून कोणताही एक कोरडा दिवस पाळावा. लहान मुलांना संपूर्ण अंग झाकेल असे सैल कपडे घालावेत. शहरी भागात कुलरमध्ये जमा असलेल्या पाण्यात ह्याची उत्पत्ती जास्त असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. सध्याच्या वातावरणामध्ये कुलरची आवश्यकता नसल्यामुळे सर्वांनी कुलर बंद करून ठेवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.


लक्षणांकडे नको दुर्लक्ष


डेंग्यू या आजारामध्ये ताप येणे, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी ई. लक्षणे असतात. ही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून वेळीच लक्षणाकरिता औषधोपचार घ्यावा. डेंग्यु आजारावर कोणतीही लस किंवा निश्चित औषधोपचार उपलब्ध नाही. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्वाचे आहे, याकरिता सतर्कता बाळगण्यासाठी मा. आयुक्त, मनपा यांनी जनतेस आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, डेंग्यूचा डास हा दिवसाच चावतो व 15 ते 20 इंचापर्यंत डंख घेण्याची क्षमता असते. त्यामुळे घराबरोबर आपल्या कामाच्या ठिकाणीही वरिल सर्व बाबींकडे नागरिकांनी लक्ष द्यावे व डेंग्यूपासून आपले संरक्षण करावे. तसेच सर्व शासकीय आणि अशासकीय संस्थांनी देखील याची दखल घेऊन आपल्या अधिनस्त कार्यालयात वरिल सर्व बाबींचे पालन करावे. सर्व शासकीय आणि खाजगी रूग्णालयामध्ये डेंग्यूचा रूग्ण आढळल्यास त्वरित मनपास माहिती दयावी. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर 2021 दरम्यान, नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 8030 तापाचे रक्तजल नमूने तपासण्यात आले. त्यापैकी 1054 दुषित आढळलेले व 06 मृत्यू झाले. यावर्षी जानेवारी 2022 पासून ते जून 2022 पर्यंत संशयीत डेंग्यू तापाचे 17 रक्तजल नमूने तपासण्यात आले. त्यात 08 दुषित डेंग्यू रूग्ण आहेत व कुठलाही मृत्यू झालेला नाही.


अशी काळजी घ्या


घराच्या सभोवताल अथवा छतावर भंगार साहित्य – टायर, नारळाच्या करवंटया, रिकामे डबे, पाण्याचे टाके, कुडया, कुलर ई. ठिकाणी डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेणे. 
आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.
लहान मुलांना संपूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावे.
घरी असलेले सर्व कुलर बंद करून पाण्याची टाकी स्वच्छ पुसून कोरडी करावी.
सभोवतालच्या परिसरातील साचलेले पाणी वाहते करावे
पाण्याची भांडी, टाकी, ओव्हरहेड टॅक, यावर कवर झाकावे.
डेंग्यू सदृश्य ताप आढळल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधुन वेळीच औषधोपचार करावा.