उस्मानाबाद: टीव्ही मालिका आणि मोबाईलमुळे प्रत्येकाचे आयुष्य गुरफटून गेलं आहे. याचा परिणाम कुटुंबासह विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करत असून त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर होत आहे. अशीच काहीशी भावना असल्याने उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जकेकूरवाडी (Jakekurwadi) या गावाने मुलांच्यासाठी  दररोज दोन तास घरातील टीव्ही आणि मोबाईल बंद (Mobile phones and TV off) ठेवण्याचा उपक्रम चालू केला आहे. या उपक्रमाला दोन दिवस झालेत. विशेष म्हणजे सर्वांचे मोबाईल आणि टीव्ही सायंकाळी सहा से आठ वाजेपर्यंत बंद ठेवले जात आहेत. 


सायंकाळी सहा ते आठ या वेळेत मुलांच्या अभ्यासासाठी ही वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. दोन-अडीच हजार लोकसंख्येचे हे गाव आहे. मुले तासंतास मोबाईलला चिकटून असतात. त्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे गाऱ्हाणे पालक मांडत असतात. नेमके सायंकाळच्या वेळेस घरात कुणीतरी टीव्ही लावून मालिका पाहण्यात गुंतून जातात. त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होतो. त्यामुळे जकेकूरवाडी (Osmanabad Jakekurwadi)गावाने हा निर्णय घेतला आहे. 


या गावात दररोज नियमाने टीव्ही आणि मोबाईल बंद करण्याची आठवण करून देण्यासाठी ग्रामपंचायतीवर भोंगा लावण्यात आला आहे. सायंकाळी सहा ते आठ या वेळेत ग्रामपंचायत  रोज सायरन वाजवते. ग्रामीण भागात मुलांना अभ्यासाची सवय लागावी, तसेच टिव्ही आणि मोबाईलसारख्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी गावामध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयातून सायरन वाजवले जाते. त्यामुळे गावकऱ्यांना आपले टीव्ही, मोबाईल, रेडिओ, लाऊड स्पीकर सर्व बंद करायचे आणि सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसायचे अशी सूचना आपोआप मिळते.


राज्यातील हा दुसरा प्रयोग आहे. असा प्रयोग यापूर्वी सांगली जिल्ह्यातील मोहितेची वाडी या गावात करण्यात आला आहे. असा उपक्रम रावणारे हे राज्यातील पहिले गाव ठरले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील जकेकूरवाडी हे राज्यातील दुसरे तर मराठवाड्यातील पहिले गाव ठरले आहे. या उपक्रमास विद्यार्थी आणि पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. मुलं घराबाहेर पडणार नाहीत याची जबाबदारी पालकांसोबत गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर आहे.


ही बातमी वाचा: