Navratri 2022 : कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर राज्यातील सण उत्सव निर्बंधांविना पार पडत आहेत. महाराष्ट्र निर्बंधमुक्त झाल्यानंतर विविध मंदिर खुली झाले आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडे तीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेलं तुळजाभवानी मंदिर (Tuljabhavani Temple) आगामी शारदीय नवरात्र उत्सव (Navratri 2022) काळात भाविकांसाठी 22 तास खुले राहणार आहे. प्रशासनाकडून नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 


तुळजापूरची तुळजाभवानी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत. 26 सप्टेंबर (घटस्थापना) ते 5 ऑक्टोबर (दसरा) या काळात तुळजाभवानी मंदिर 22 तास खुले राहणार आहे. नवरात्र काळात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर 22 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे मंदिर रात्री 1 वाजता उघडले जाणार आणि रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजे 22 तास सुरु राहणार आहे. मागील दोन वर्षे कोरोनाचे निर्बंध होते. मात्र यंदा पहिल्यांदा कोणतेही निर्बंध नसल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.


यावर्षी 26 सप्टेंबर 2022 पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. 26 सप्टेंबर रोजी पहाटे तुळजाभवानी मातेची प्रतिष्ठापना होऊन दुपारी 12 वाजता सिंह गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात येईल. घटस्थापना होऊन शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या दरम्यान असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.


शारदीय नवरात्रोत्सव काळात सोललेले नारळ, सुट्या तेलाच्या विक्रीला बंदी
शारदीय नवरोत्रोत्सवात यंदा तुळजापूर येथील तुळजाभवानी परिसरात सोललेले नारळ आणि सुटे तेल विकता येणार नाही. या काळात या गोष्टींच्या विक्रीवर या परिसरात बंदी करण्यात आली आहे. बंदीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. 17 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान मंदिराच्या 200 मीटर परिसरात हा नियम लागू असेल.


तुळजाभवानी मंदिरात रंगरंगोटी, साफसफाईची कामं
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात रंगरंगोटी, साफसफाईसह दुरुस्तीची कामं युद्ध पातळीवर सुरु आहेत. घटस्थापनेपूर्वी सर्व कामं पूर्ण करण्याचं नियोजन आहे. तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सवास 26 सप्टेंबरला घटस्थापनेपासून प्रारंभ होत आहे. घटस्थापना ते अश्विनी पौर्णिमा असे 15 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दररोज सरासरी दोन लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानने तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे भाविकांच्या वतीने पहिल्यांदाच सिंहासनाला पॉलिश करण्यात येत आहे. तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरु असल्याने सिंहासन रिकामं आहे. या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मातेच्या चांदीच्या सिंहासनाला पॉलिश करण्याचे काम सुरु करण्यात आलं आहे.