मुंबई : राज्यभरातील परिचारिकांनी 1 सप्टेंबरपासून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही 8 सप्टेंबरला एक दिवसीय काम बंद आंदोलन करणार आहोत. या दिवशी राज्यातील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये जी समस्या निर्माण होईल, याला पूर्णपणे राज्य शासन जबाबदार असेल असं महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या उपाध्यक्षा हेमलता गाजबे यांनी म्हंटल आहे.


राज्यात परिचारिकांची तब्बल 70 ते 80 हजार संख्या आहे. या सर्वांनी 1 तारखेपासून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत परिचालिका संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा हेमलता कसबे बोलताना म्हणल्या की, सध्या राज्यात परिचारिकांची मोठी भरती रखडली आहे त्यामुळे परिचारिकांवर ताण पडत आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्यात यावी. यासोबतच सध्या कोरोना बाधित होणाऱ्या परिचारिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे परिचारिकांना 7 दिवस क्वॉरंटाईन करण्यासाठी परवानगी द्यावी. या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास आम्ही 8 तारखेला काम बंद आंदोलन करू असा इशारा देखील संघटने दिला आहे.


याबाबत बोलताना गाजबे म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्यातील परिचारिकांनी मागण्यांसाठी संपावर जाण्याचा पवित्रा घेतला आहे. सर ज. जी समूह रुग्णालय मुंबई येथे ही आधीसेविका कार्यालयासमोर राज्य उपाध्यक्षा मॅडम हेमा गाजबे आणि सर ज जी समूह रुग्णालय अध्यक्षा आरती कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळपाळीसाठी आलेल्या परिचारिकांनी काळी फीत लाऊन आणि घोषणा देऊन आंदोलनात आपला सहभाग दर्शवला. परिचारिकांना काही मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून रखडवले जात आहे. त्यामुळे, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने परिचारिकांच्या मागण्यांसाठी 1 सप्टेंबर 2020 पासून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही देण्यात आले होते. मात्र, त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे, परिचारिका सरकार विरोधात आपला निषेध व्यक्त करत आहे.

गेल्या अनेक वर्षापासून सर्व स्तरावरची पदे रिक्त आहेत, त्या पदांची नियमित भरती करणे गरजेचे आहे. परिचारिकांची संख्या अत्यल्प आहे त्यामुळे सर्व स्तरावरचे पदोन्नती आणि पदभरती अत्यावश्यक आहे. 100 टक्के परिचारिकांच्या पदभरतीसाठी शासनाने परवानगीही दिली आहे. परंतु प्रत्यक्षात पदभरती झालेली नाही. कोविड कक्षात रोटेशन करताना अत्यंत अपुरे मनुष्यबळ असल्याने आणि रुग्ण संख्या क्षमतेपेक्षा खूप जास्त असल्यामुळे परिचारिकावर प्रचंड मानसिक ताण येतो, म्हणून 7 दिवस रोटेशन आणि 7 दिवस क्वॉरंटाईन हा क्रम कायम ठेवावा. तसेच, प्रोटीनयुक्त आहार आणि चांगल्या दर्जाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता नव्याने मंजूर करून देण्यात यावा. कोणत्याही घटनेत अधिकाराचा गैरवापर करून परिचारिकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर विनाविलंब कडक कार्यवाही करण्यात यावी. राज्यातील परिचारिकांना फक्त रुग्णसेवेचीच कामे द्यावी, ग्रामीण रुग्णालय स्तरावर मासिक अहवाल तयार करणे, डाटा एन्ट्री इ. कारकुनाची कामे त्यांच्याकडून काढून घेण्यात यावी.


7 सप्टेंबरपर्यंत काळ्या फिती लावून परिचारिका काम करणार आहेत आणि निदर्शने करणार आहेत. जर तरिही मागण्या मान्य झाल्या नाही तर, 8 सप्टेंबर 2020 या दिवशी एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात येईल, त्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावर जातील असे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या उपाध्यक्ष हेमलता गाजबे यांनी सांगितले आहे.