रायगड : रायगड जिल्ह्यातील उरण पनवेल मार्गावरील गव्हाण टाकीनजीक पाण्याची पाईपलाईन फुटल्याने नवी मुंबई, पनवेल, पेण आणि उरण परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नवी मुंबईकडे जाणाऱ्या पाईपलाईनचे काम सुरू असल्याने आज रात्री उशिरापर्यंत पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. 


शनिवारी सायंकाळच्या सुमारास उरण - पनवेल मार्गावरील गव्हाण टाकीनजीक असलेल्या पाण्याची पाईपलाईन ही अचानक फुटली होती. यावेळी, पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून नवी मुंबईकडे जाणारी सुमारे पाच फूट रुंदीची पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया गेले. 


यावेळी, टेकडीवर असलेल्या पाईपलाईनमधील पाणी आणि दगडमाती ही जवळच असलेल्या जेएनपीटी रेल्वे रुळावर आल्याने मालवाहतुक करणाऱ्या रेल्वेचे इंजिन देखील रुळावरून घसरले होते. तर, यामुळे, रेल्वे रुळावर सुमारे दीड ते दोन फूट दगडमाती साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे , दिल्लीहून जेएनपीटी बंदराकडे निघालेल्या मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या इंजिन आणि डब्यांभोवती दगडमातीचा ढिगारा साचला होता. 


यामुळे, जेएनपीटीकडे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने तातडीने हा मातीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम करण्यात आले. यामुळे, सुमारे नऊ तासांच्या प्रयत्नांनंतर जेएनपीटीकडे जाणारी रेल्वे मालवाहतूक पूर्ववत करण्यात आली. 


तर, काल सायंकाळपासून पाण्याची पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू असून आज रात्री उशिरापर्यंत नवी मुंबईकडे जाणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे पेण, पनवेल, उरण परिसरातील सुमारे 40 गाव आणि नवीमुंबईतील खारघर, उलवा परिसरातील पाणीपुरवठा आज दिवसभर बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळे, या संपूर्ण परिसरातील पाणीपुरवठा हा किमान 25 ते 30 तास बंद राहणार आहे.