मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai News) उलवे येथे साकारत असलेल्या बालाजी मंदिराच्या उभारणीत विघ्न येण्याची शक्यता आहे. नुकतेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उलवे येथे तिरूपती बालाजी (Balaji Temple) मंदिराचे भूमीपूजन केले होते. न्हावासेवा सी लिंक च्या शेजारीच बनत असलेल्या बालाजी मंदिराच्या जागेवरून पर्यावरण प्रेमिंनी आक्षेप घेत केंद्रीय पर्यावरण विभागाला तक्रार केली आहे. सिडकोकडून बालाजी मंदिरासाठी दिलेला 10 एकर क्षेत्राचा भूखंड पाणथळ जागेवर असल्याचा अहवाल वन विभागाने दिला आहे.
मंदिर उभारणीत अडचणी वाढल्या
वन विभागाच्या अहवालामुळे मंदिर उभारणीच्या कामातील अडचणी वाढल्या आहेत. महाविकास आघाडीच्या काळात हा भूखंड वाटप करण्यात आला होता. त्यावेळी राज्याचे पर्यावरण विभागाचे मंत्री अदित्य ठाकरे होते. पर्यावरणवाद्यांनी सिडको मंडळाकडे भूखंड वाटपावर आक्षेप घेतल्यानतंरही भूखंड हस्तांतरण प्रक्रिया सुरुच राहिली. मात्र पर्यावरणवाद्यांनी कांदळवन समिती, रायगड जिल्हाधिकारी, केंद्रीय व राज्य पर्यावरण विभाग आणि विविध विभागांकडे तक्रारी केल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी सागरशक्ती संस्था, वन विभागाचे अधिकारी यांनी संबंधित जागेवर जाऊन पाहणी केली. पाहणीत ही जागा पाणथळ आणि खारफुटीमध्ये येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे मंदिर उभारणीत अडचणी वाढल्या आहेत.
उलवे येथील खाडीकिनारी 10 एकर जागेवर भव्य असे बालाजी मंदिर साकारण्यात येणार आहे. यासाठी 60 ते 70 कोटी खर्च अपेक्षीत असून हा खर्च रेमंड ग्रुपचे मालक गौतम सिंघानिया करणार आहेत.नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळ ही जागा आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डातर्फे देशात हैद्राबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगलुरु, विशाखापट्टनम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र व ऋषिकेश या ठिकाणी शहर पातळीवरील सुविधा म्हणून भगवान श्री व्यंकटेश्वराचे मंदिर उभारणी करण्यात आली आहे. या धर्तीवर नवी मुंबईमध्ये मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानाने जमीन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.
ज्या भक्तांना आंध्र प्रदेश इथे जाऊन बालाजीचे दर्शन घेता येत नाही त्यांच्यासाठी नवी मुंबईत भव्य असे तिरुपती बालाजी मंदिर उभारण्यात येणार आहे.उलवे इथे दहा एकर जागेवर हे मंदिर साकारण्यात येणार आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या आंतरावर मंदिर असणार आहे.
हे ही वाचा :
14,000 कोटींची एफडी, 14 टन सोनं आणि 85 हजार कोटींची मालमत्ता; तिरूपती बालाजी मंदिराची संपत्ती जाहीर