नवी मुंबई: सीमाशुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयंक सिंग यांच्या घरी सीबीआयने (CBI) गुरुवारी (24 ऑगस्ट) छापेमारी केली, यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी आत्यमहत्या करुन आपलं जीवन संपवल्याची घटना घडली. खारघर (Kharghar) येथील तळोजा मध्यवर्ती तुरुंगालगतच्या तलावात उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. सीबीआय चौकशीला कंटाळून ही आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.


नक्की प्रकरण काय?


सीबीआयने 24 ऑगस्ट रोजी नवी मुंबईतल्या कस्टमचे अधीक्षक मयंक सिंग यांच्या घरी छापेमारी केली होती. सीमाशुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयंक सिंग यांच्याविरोधात सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. कस्टम विभागाकडे प्रलंबित असणारी दोन बिलं मयंक सिंग यांनी लाच घेऊन क्लियर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआय मयंक सिंग यांच्या नवी मुंबईतील (Navi Mumbai) राहत्या घरी पोहोचले. 24 ऑगस्टला छापेमारी झाली आणि दुसऱ्याच दिवशी, म्हणजे 25 ऑगस्टला मयंक सिंग यांनी तळोजा येथील तलावात उडी मारून आत्महत्या केली.


पोलिसांनी केली आकस्मित मृत्यूची नोंद


शुक्रवारी (25 ऑगस्ट) खारघर येथील तळोजा मध्यवर्ती तुरुंगालगतच्या तलावात एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आणि परिसरात खळबळ उडाली. हा तरुण कोण? याचा तपास खारघर पोलिसांनी सुरू केला आणि अखेर मृत व्यक्तीची ओळख पटली. या मृत व्यक्तीचं नाव मयंक सिंग असून ते तळोजा कारागृहाजवळ असणाऱ्या व्हॅलीशिल्प सोसायटीत राहत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या तपासात मयंक यांची सीबीआयकडून चौकशी सूरु असल्याचं समजलं. मयंक यांनी त्यांची मोटार तलावापासून काही अंतरावर उभी केली होती. मयंक सिंग यांच्या आत्महत्येनंतर खारघर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


आठवडाभरापूर्वीच सीबीआयने जीएसटी अधिकाऱ्यालाही केली अटक


सीबीआयने 18 ऑगस्टला जीएसटी अधिकाऱ्याला लाच घेताना अटक केली आहे. इतकंच नाही तर यावेळी सीबीआयने सुमारे 43 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. सीबीआयने सीजीएसटीच्या (CGST) एका अधीक्षकाला पाच लाख रुपयांची लाच मागितल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल अटक केली. याच ठिकाणी तपास घेत असताना पथकाला 42.70 लाख रुपयांची रोकड सापडली. अटक करण्यात आलेल्या जीएसटी अधिकाऱ्याचं नाव हेमंत कुमार असून ते CGST च्या भिवंडी आयुक्तालय अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.


सविस्तर वाचा:


Mumbai : GST अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक, सुमारे 43 लाखांची रोकड जप्त