नवी मुंबई: उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख याच्या नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी सकाळी कर्नाटकमधून मुसक्या आवळल्या. दाऊद शेख याने यशश्रीची (Yashshree Shinde) हत्या केल्याचे सांगितले जात असून आता त्याच्या चौकशीत संपूर्ण घटनाक्रम लवकरच समोर येईल. तत्पूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी मंगळवारी यशश्री शिंदे हिच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी यशश्रीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.


शर्मिला ठाकरे यांनी पोलिसांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, आम्ही पोलिसांवर प्रचंड नाराज आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये कारवाई करताना पोलिसांना कोणताही राजकीय पक्ष अडवणार नाही. मुलींची सुरक्षा ही तुमची जबाबदारी आहे. अशा घटना घडल्यानंतर कोणताही पक्ष तुम्हाला अडवणार नाही. जसं पुण्यातील पोर्शे प्रकरणात कोणत्या तरी आमदाराने पोलीस ठाण्यात जाऊन कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. तसे या प्रकरणात घडणार नाही. तुम्ही तुमची दहशत दाखवा, काय चाललंय हे, अशा शब्दांत शर्मिला ठाकरे पोलिसांवर कडाडल्या.


उरण हत्याकांडाविषयी (Uran Murder Case) बोलताना शर्मिला ठाकरे यांनी म्हटले की, हिंस्त्रपणा म्हणजे किती असावा? निर्भया प्रकरणात 16 वर्षांचा मुलगा सुटला. ज्या मुलात इतकी विकृती असेल, त्याला आयुष्यभर तुरुंगात ठेवलं पहिजे, किंबहुना फाशीच दिली पाहिजे. अशा गुन्हेगारांना रोखायचं असेल तर पोलीस काय करु शकतात, हे या नराधम पुरुषांना कळाले पाहिजे, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले.


शक्ती कायदा कठोर करा: शर्मिला ठाकरे


शर्मिला ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठीचा शक्ती कायदा कठोर करण्याची मागणी केली. पंतप्रधान मोदी यांच्याकडे कायदा कठोर करा, याविषयी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. नवी मुंबईतील ही तिसरी घटना आहे. दोन महिन्यात कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. उरण, तळोजा आणि न्हावा परिसरात या घटना घडल्यात. पोलिसांवर मी नाराजी व्यक्त केलीय. साहेब नेहमी पोलिसांचं कौतुक करतात. मात्र, आता आम्ही नाराज आहोत. या घटनानंतर ब्रिटिशकालीन काळात तशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे आता कायदे बदलण्याची गरज आहे. फास्ट ट्रॅकवर सगळं व्हायला हवं. पोलिसांनी ठरवलं तर काहीही करू शकतात. अशा काही घटनात राजकीय हस्तक्षेप होत असेल तर पोलिसांनी त्यांची नावे उघड करावीत. पोलिसांकडे आम्ही नाराजी व्यक्त केली आहे.पोलिसांनी आता गुन्हेगारांविरोधात जहाल भूमिका घ्यावी, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले. 


आणखी वाचा


मोठी बातमी : यशश्री-दाऊदची जुनी ओळख, पण 3-4 वर्षात भेटले नव्हते, भेटल्यानंतर वादातून हत्या, पोलिसांनी घटनाक्रम सांगितला!