Yashshree Shinde Case Accused Dawood Shaikh Arrested: नवी मुंबई : उरण हत्याकांडामधील (Uran Crime Case) आरोपी दाऊद शेखच्या (Dawood Shaikh)  मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. यशश्रीची हत्या झाल्यापासूनच दाऊद शेख फरार होता. यशश्रीच्या शरीराची विटंबना करून तिची हत्या करणारा नराधम दाऊद शेखला शोधण्यासाठी पोलिसांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. अखेर कर्नाटकातून दाऊदला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. दाऊद शेख व्यतिरिक्त याप्रकरणात आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्हीतून समोर आलेल्या फुटेमध्ये हत्या झाली त्या दिवशी यशश्री शिंदे हातात काळी छत्री घेऊन जाताना दिसत होती. तिच्या पाठोपाठ अवघ्या 10 मिनिटांतच दाऊद शेख जाताना दिसला होता. 


उरण हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई पोलिसांनी दाऊद शेखला कर्नाटकमधून ताब्यात घेतले. यशश्री शिंदे  हिची हत्या झाल्यापासून दाऊद फरार होता. दाऊद शेख याचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी तब्बल सात पथकं तयार केली होती. अखेर चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना दाऊदच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. यशश्रीची हत्या झाल्यानंतर दाऊद फरार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते, परंतु दाऊद शेख सातत्यानं लोकेशन बदलत होता. अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दाऊदला कर्नाटकमध्ये पकडलं आहे. 


आणखी एक आरोपी ताब्यात 


उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमानं यशश्रीला अक्षरश: हालहाल करुन ठार मारल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोहसिन नावाच्या तरुणाला कर्नाटकातून ताब्यात घेतलं आहे. मोहसिनला पुढील चौकशीकरता महाराष्ट्रात आणलं जाणार आहे. यशश्री बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगानं हलवली. त्यावेळी यशश्रीच्या कॉल रेकॉर्ड्सवरुन एका नंबरवर तिचं सातत्यानं बोलणं होत असल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी तपासाची दिशा त्यानुसार वळवली आणि तो नंबर ज्याच्या नावावर होता, त्याचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांच्या हाती यश आलं असून पोलिसांनी तो नंबर ज्या व्यक्तीचा होता, त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 


यशश्रीसोबत नेमकं काय घडलं? 


उरणमधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमाने यशश्रीला अक्षरश: हालहाल करुन ठार मारल्याची (Uran Murder Cae) माहिती समोर आली. यशश्रीच्या मारेकऱ्यानं निर्दयीपणे तिच्यावर वार केले, तिच्या शरीराची अक्षरशः विटंबना केली. तिच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन यशश्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न करण्यात आला होता. त्यानंतर उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडुपांमध्ये तिचा मृतदेह फेकून देण्यात आला. 


यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात एका दाऊद शेख नामक व्यक्तीचा उल्लेख केला. त्याच्याकडून मृत्यूपूर्वी यशश्रीवर बलात्कार करण्यात आला होता का? याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. या घटनेनंतर दाऊद शेख या आरोपीला पकडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांवर प्रचंड दबाव निर्माण केला आहे. दाऊद शेख यानं यशश्री शिंदे 15 वर्षांची असतानाही तिच्यावर अत्याचार केले होते. दाऊद शेख हा एक ट्रक ड्रायव्हर आहे. त्याने 2018 साली पहिल्यांदा यशश्री शिंदे हिला पाहिले. त्यावेळी यशश्री 15 वर्षांची होती. दाऊद शेखनं त्यावेळी यशश्रीला आपल्या जाळ्यात ओढले आणि 2019 साली त्यानं तिच्यावर अत्याचार केले होते. त्यावेळी यशश्री शिंदे हिच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार दाऊद शेख याच्यावर पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याची तुरुंगातून रवानगी करण्यात आली होती. अलीकडेच तो तुरुंगातून सुटला होता. यानंतर त्यानं पुन्हा यशश्रीचा पाठलाग करायला सुरुवात केली. दाऊद शेख सतत यशश्रीला फोन करायचा. अखेर 25 जुलैला ती घराबाहेर पडल्यानंतर दाऊद शेखनं तिला गाठून तिची हत्या केल्याचा संशय आहे. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी यशश्री पनवेल स्टेशनकडे गेली. सायंकाळी साधारण साडेचारनंतर तिचा फोन बंद झाला. त्यानंतर यशश्री कोणालाच दिसली नाही. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.