नवी दिल्ली : स्वर्गीय दि. बा. पाटील यांनी भूमिपुत्रांसाठी केलेल्या संघर्षाची जाणीव पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला पाठवला आहे. त्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत दिल्लीमधील केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयात येथे महायुती सरकारच्या शिष्टमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्या बैठकीत विमानतळाच्या नामांतराबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.


शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधानसभेचं सभागृह दणाणून सोडणारे, भूमिपुत्रांच्या न्यायासाठी आंदोलनाची हाक देणारे, प्रकल्पग्रस्तांसाठी साडेबारा टक्क्यांचा विकसित भूखंडाचा मोबदला ही योजना मांडणारे, या योजनेद्वारे नवी मुंबई आणि रायगडमध्ये भूमिपुत्रांचे अस्तित्व टिकवून ठेवणारे, भूमिपुत्रांचे दैवत म्हणजे दि बा पाटील होते असे गौरवोद्वार रवींद्र चव्हाण यांनी काढले. 


मोदी सरकार हे देशातील भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या नेत्यांचा सन्मान करणारे सरकार असून केंद्र सरकार त्या प्रस्तावाला नक्कीच मंजूरी देईल, असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला. त्यावेळी माजी मंत्री कपिल पाटील, जगन्नाथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी खासदार संजीव नाईक, मनसे आमदार राजू पाटील, शेकापचे नेते जे. एम. म्हात्रे, संतोष केणे यांसह ठाणे, रायगड आणि नवीमुंबईतील नेत्यांचा समावेश या शिष्टमंडळात होता.