Karni Sena:  वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या 'करनी सेना' (Karni Sena) या संघटेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अजय सेंगर (Ajay Sengar) यांना पनवेल येथे मारहाण करण्यात आली आहे. आंबेडकरी अनुयांयी असलेल्या दोघांनी अजय सेंगर यांना चोप दिला. यावेळी शिव्यांची लाखोली देखी वाहण्यात आली. काही दिवसांपुर्वी डॅा बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या सविधानावर आक्षेपार्ह वक्तव्य अजय सेंगर यांनी केले होते. याचा राग मनात धरून दोघांनी अजय सेंगर यांच्या कानशिलात दिल्या. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


महाराष्ट्र करनी सेनेचे अध्यक्ष असलेले अजय सेंगर हे नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत. महात्मा गांधी यांनी गोळ्या घालणाऱ्या नथुराम गोडसे याचा जयजयकार करण्याचे काम अजय सेंगर करीत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते नथुराम गोडसे जयंती आणि पुण्यतिथी साजरी करीत आहेत. या कार्यक्रमा दरम्यान महात्मा गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून आक्षेपार्य विधाने अजय सेंगर करीत होते. तर दुसरीकडे नथुराम गोडसे खरे देशभक्त असल्याचे सांगत गोडसेचा जयजयकार सेंगर यांनी केला. 


काही दिवसांपुर्वी समान नागरी कायद्याचे समर्थन करीत आरक्षण रद्द केले पाहिजे अशी मागणी सेंगर यांनी केली होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या सविधानाबद्दल देखील आक्षेपार्ह वक्तव्य सेंगर यांनी केले होते. हाच राग मनात धरत आंबेडकरी अनुयायी असलेल्या दोघांनी अजय सेंगर यांना मारहाण केली. 


दरम्यान आपल्यावर झालेला हल्ला हा हिंदू समजावरील हल्ला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्या नंतर आपण त्यांच्यावर टिका केली होती. समान नागरी कायदा कसा योग्य आहे. याबाबत वक्तव्य केले होते.  यामुळेच आपल्यावर हा हल्ला वंचीतच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप अजय सेंगर यांनी केला आहे. 


अजय सेंगर वारंवार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करीत असतात. याबाबत आपण पोलीस ठाण्यात जावून तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलीसांनी दखल न घेतल्याने आपण अजय सेंगर याला मारहाण केली असल्याचे सुभाष गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, याआधी देखील अजय सेंगर यांच्याविरोधात 2022 मधील डिसेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन समाजात तेढ पसरेल आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होईल या अनुषंगाने भाषण केल्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: