Ganesh Naik Shocks Eknath Shinde : राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपा (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट एकत्र आले असले तरी स्थानिक पातळींवर सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. वर्षभरापूर्वी भाजपाचे असलेले तीन नगरसेवक (Corporator) नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता परत एकदा घरवापसी करत या तीन माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेला अनेक धक्के बसले आहेत. आमदारांपाठोपाठ अनेक ठिकाणचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारीही शिंदे गटात सामील झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता तर शिवसेनेचे बहुतांश खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. परंतु याच वेळी शिंदे यांच्या मर्जीतील शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवक घरवापसी करत भाजपमध्ये प्रवेश केला.
ऐरोलीचे भाजपा आमदार गणेश नाईक (MLA Ganesh Naik) यांच्या उपस्थितीत या तीन माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिघा विभागात प्राबल्य असलेले गवते परिवार एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील नगरसेवक होते. गणेश नाईक यांनी या तीन नगरसेवकांना भाजपात घेत एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे गट एकत्र आल्यानंतर ही पहिलीच घटना आहे. सध्या शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात सुरु असलेला गोंधळही यासाठी कारणीभूत असल्याचे बोललं जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडून 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ
जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली. शिवसेनेच्या 40 आणि दहा अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अखेरीस पद सोडावं लागलं. यानंतर आठ दिवसांनी 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री म्हणून आणि भाजपचे देवेंद्र फडणवी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.