Vegetables Price : नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून भाजीपाल्याची आवक वाढली आहे. परिणामी भाज्यांचे दर कमी होऊ लागले आहेत. एपीएमसीमध्ये सध्या पाचशे ते साडेपाचशे गाड्यांची आवक होत आहे. यामुळे जवळपास 30 ते 40 टक्क्यांनी भाजीपाला दर उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी तब्बल प्रतिकिलो शंभरी गाठलेला टोमॅटो आता 20 ते 25 रुपये किलो दराने विकला जात आहे. तर मेथीचे दरही उतरले आहेत. मेथीच्या एका जुडीसाठी आता दहा रुपये मोजावे लागत होते.


एपीएमसी मार्केटमध्ये महाराष्ट्रामधील पुणे, अहमदनगर, नाशिक, सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत आहे. त्याचबरोबर गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमधून सुद्धा अनेक भाज्या दाखल होत आहेत. आवक वाढली असतानाच मुंबईत गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने भाजीपाल्याला उठाव नाही. भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने येत नसल्याने भाजीपाला एपीएमसीत शिल्लक राहत आहे. याचाही फटका बसल्याने दर खाली आले आहेत. 


कोथिंबीर, कोबी, प्लॉवर, गावठी वांगे, टोमॅटो, गाजर, ढोबळी मिरची, कारले, पालक, कांद्याची पात, पालक आदी भाज्यांचे भाव कमी झाले आहेत. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक वाढल्याने भाजीपाल्याचे किरकोळ भाव कमी झाले. यामुळे सर्वसामान्य ग्राहक खुश झाला आहे; परंतु भाव घसरल्याने शेतकरी आणि भाजीविक्रेते चिंतेत आहे. काही दिवस हे दर असेच राहतील असं म्हटलं जात आहे.


भाजीपाला दर प्रति किलो


1) टोमॅटो - 20 ते 25 रुपये
2) सिमला मिर्ची - 30-32 रुपये
3) वांगी - 16-18 रुपये
4) दुधी भोपळा - 28-30 रुपये
5) कोबी - 10-12 रुपये
6) भेंडी - 40-45 रुपये
7) कारले - 25-28 रुपये
8) काकडी - 20-22 रुपये
9) गाजर - 30-32 रुपये


पालेभाज्या
1) कोथिंबीर - 10 रुपये  जुडी
2) मेथी - 10 रुपये जुडी
3) पालक - 8-10 रुपये जुडी
4) पुदिना - 15 रुपये जुडी