Navi Mumbai News :  कल्याणला जाणाऱ्या ऐरोली-काटयी ऐलीव्हेटेड रोडला (Airoli Katayi elevated road) नवी मुंबईत (Navi Mumbai ) एन्ट्री आणि एग्झिटच नाही. ऐरोली येथे ठाणे बेलापूर हायवेला एन्ट्री न दिल्याने नवी मुंबईतील वाहणांना या हायवेचा वापर करून मुंबईला जाता येणार नाही. शिवाय एग्झिट न दिल्याने मुंबईतून आलेल्या वाहणांना ऐरोलीत उतरतां येणार नाही. एन्ट्री आणि एग्झिट नसल्याने या हायवेचा नवी मुंबईकरांना काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे या एलिव्हेटेड हायवेला ऐरोलीत एन्ट्री आणि एग्झिट न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी दिलाय.


ऐरोली - काटईनाका एलिव्हेटेड रोडचे काम प्रगतीपथावर आहे. राज्य सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून मुंबईला थेट कल्याणशी जोडणारा हा रस्ता आहे. हा रस्ता नवी मुंबईतील ऐरोली मार्गे जात आहे. 1400 कोटी रूपये खर्च करून 12 किलोमीटरचा हा हायवे तयार करण्यात येत आहे. ऐरोली खाडी पुलावरून सरळ एलिव्हेटेड हायवे हा नागरी वस्तीवरून पारसिक हिल डोंगरात बोगदा पाडून थेट कल्याणला जात आहे. परंतु, ऐरोली येथे ठाणे बेलापूर हायवेला एन्ट्री न दिल्याने नवी मुंबईतील वाहनांना या हायवेचा वापर करून मुंबईला जाता येणार नाही. तसेच एग्झिट न दिल्याने मुंबईतून आलेल्या वाहनांना ऐरोलीत उतरता येणार नाही. या कामाची आज आमदार गणेश नाईक यांनी पाहणी केली. यावेळी एन्ट्री आणि एग्झिट पॉईंट नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. नवी मुंबईकरांना देखील या रस्त्याचा वापर व्हावा यासाठी एन्ट्री आणि एग्झिट देण्यात यावी अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी दिली. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल आणि या रस्त्याचे काम बंद पाडू असा इशारा यावेळी गणेश नाईक यांनी दिलाय. 


नवी मुंबईकरांसाठी महत्वाचा रस्ता


ऐरोली-काटयी एलिव्हेटेड हा रोड मुंबईसह ठाणे व नवी मुंबई या शहरांना कल्याण-डोंबिवलीसह भिवंडी आणि अंबरनाथ- बदलापूर या शहरांना जोडण्यासाठी महत्त्वाचा आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या 12 किलोमीटरच्या मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. या मार्गांतर्गत असलेल्या पारसिक डोंगरामधील मुंब्रा ते ऐरोली बोगद्याच्या डाव्या बाजूच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियंत्रित स्फोट पद्धतीचा वापर करून हा बोगदा पुढील कामासाठी दोन्ही बाजूने खुला करण्यात आला आहे. 


कसा आहे हा मार्ग?


ऐरोली-काटई नाका प्रकल्प हा तीन भागात विभागला आहे. यातील पहिल्या भागाअंतर्गतचा रस्ता हा ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार असा आहे. या भागाची लांबी 3.4 किलोमीटर एवढी आहे. ऐरोली ते ठाणे बेलापूर मार्ग, ठाणे-बेलापूर ते मुंब्रा बायपास आणि मुंब्रा बायपास ते कल्याण-काटई असा 12 किलोमीटरचा प्रत्येकी तीन मार्गिका असलेला हा रस्ता आहे.