Loudspeaker Row: राज्यासह संपूर्ण देशात भोंग्यावरून वातावरण तापलं आहे. यामध्येच शिर्डीत एकीकडे साईंची काकड आरती लाऊडस्पीकर विना होत असल्याने भक्तांमध्ये नाराजी आहे. तर दुसरीकडे पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराला लाऊडस्पीकरची परवागी मिळावी, म्हणून तयारी सुरू झाली आहे. अशातच राज्यातील धार्मिक स्थळांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधील संत गजानन महाराज मंदिराचा आदर्श घ्यायला हवा. या मंदिराला लाऊडस्पीकरची परवानगी असतानाही मंदिरात अत्यंत कमी आवाजात आरती केली जाते. जेणेकरून परिसरातील इतर धर्मियांना किंवा लोकांना याचा त्रास होऊ नये.


संत गजानन महाराज मंदिरात शिस्तीला अग्रक्रम दिला जातो. या मंदिरात वर्षानुवर्षे मंदिरात संत गजानन महाराजांची आरती असो की इतर भक्ती गीते, अतिशय कमी आवाजात आणि लहान स्पीकरवर लावली जातात. सकाळी सात वाजता पहिली आरती केली जाते, त्याआधी 5 मिनिटे भक्ती गीते मंद आवाजात मंदिर परिसरात ऐकू येतात. याचा आवाज इतका कमी असतो की भाविकांच्या कानालाही तो सुमधुर वाटतो. आरतीच्या वेळीही आवाजाचे डेसीबल इतके कमी असतात की मंदिरातील आरतीचा आवाजही मंदिरा बाहेर ऐकू येत नाही. त्यामुळे राज्यात भोंग्याने घातलेला धुमाकूळ बघता इतर धार्मिक स्थळांनी सुद्धा श्री संत गजानन महाराज मंदिराचा आदर्श घ्यावा, अशी येथे येणारे भक्त सांगताना दिसत आहेत.


शिर्डीत साईंची आरती स्पीकरविना 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांविरोधात दिलेल्या अल्टीमेटमनंतर पोलिस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस दिल्या. ज्याचा फटका शिर्डीच्या साईमंदिराला देखील बसल्याचा पाहायला मिळत आहे. साईंची पहाटे होणारी काकड आरती लाऊडस्पीकर विनाच पार पडत आहे. यामुळेच भक्तांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मंदिर प्रशासनाने लाऊडस्पीकरसाठी परवानगी मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे. यामध्येच येथील मुस्लीम धर्मीयांनी साईंच्या काकड आरतीला परवानगी द्यावी, त्यासाठी आम्ही पहाटे मशिदीची अजान करणारा नाही, असं अर्ज पोलीस ठाण्यात दिलं आहे.        


पंढरपुरातही भोंगे बंद  


शिर्डीच्या साई मंदिरासोबतच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराने देखील काकडा आरती आणि धुपारती लाऊडस्पीकर विनाच पार पडत आहे. मंदिर प्रशासनाने आता पोलिसांकडे स्पीकर वापरासाठी परवानगी घेण्याची तयारी सुरु केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विठ्ठल मंदिरात स्पीकर वापरला जाईल, असं व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितलं. 


संबंधित बातमी: 


Shirdi : शिर्डीत साईंची काकड आरती, शेजारती होणार लाऊडस्पीकर विना; सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत परवानगी, भक्तांमध्ये नाराजी 
विठ्ठल मंदिराला राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा फटका, मंदिर प्रशासन पोलिसांकडून भोंग्याची परवानगी घेणार