नाशिक : गेल्या काही दिवसांत झालेल्या धुवांधार पावसानं नाशिकला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण 72 टक्के भरलं आहे. त्यामुळे नाशिककरांची पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील 6 तालुके आजही पाण्यासाठी तहानलेले दिसून येत आहेत.


नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला तसंच सिन्नरच्या काही भागात पावसानं पूर्णपणे पाठ फिरवली असून, आजही इथे टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचं दिसून येतं आहे. सहा तालुक्यात मिळून 21 टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे.

पावसानं वक्रदृष्टी फिरवल्यानं या भागातला बळीराजाही चिंतेत सापडला आहे.

याबाबत माहिती देताना निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी सांगितलं की, नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी सहा तालुक्यांमध्ये पावसाचं अल्प प्रमाण आहे. यात प्रमुख्यानं सटाणा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि सिन्नरचा काही भागात पावसाचं दडी मारल्यानं आजही त्या भागात टँकरनं पाणी पुरवठा सुरु आहे.

पश्चिम नाशिकमध्ये पावसाचा कहर


दरम्यान, गेल्या काही दिवसात पश्चिम नाशिकला पावसानं झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे पश्चिम नाशिकचा भाग जलमय झाला होता. तसेच यामुळे गोदावरी नदीला पूर आला होता. या पूरात वाहून जाणारी वाहने वाचवताना स्थानिकांची मोठी दमछाक होत होती.

तर शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातल्या घोटी-सिन्नर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. देवळे पुलाला भगदाड पडल्यामुळे वाहतूक रोखण्यात आली होती. तहसिलदारांनी वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते.