Sanjay Raut on Ramdas Kadam : आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून माजी आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, विद्यमान आमदार रामदास कदम यांचा पुन्हा संधी देण्याचे शिवसेनेने टाळले आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सुनील शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. सुनील शिंदे यांनी केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली असल्याचे राऊत यांनी म्हटले. 


संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी संजय राऊत यांनी सुनील शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. सुनील शिंदे हे मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार होते. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुनील शिंदे यांनी ही जागा त्यांच्यासाठी सोडली होती. त्याशिवाय, सुनील शिंदे यांनी अनेक वर्ष पक्षासाठी काम केले आहे. त्यांच्या या पक्षकार्याची आणि केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवून विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. 


रामदास कदम यांच्याबद्दल काय म्हणाले राऊत?


शिवसेनेने विद्यमान आमदार रामदास कदम यांना पुन्हा विधान परिषदेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. रामदास कदम यांच्यावर अन्याय झाला का, असे विचारण्यात आले असता संजय राऊत यांनी थेट भाष्य करण्याचे टाळले. संजय राऊत यांनी म्हटले की, रामदास कदम हे कडवट शिवसैनिक आहेत. शिवसेनेसाठी त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहे. त्यांना पक्षाने आमदार ही केले होते. त्याशिवाय,  सरकारमध्ये मंत्रीदेखील होते. विधान परिषदेत त्यांनी पक्षाचे नेतृत्वही केले आहे. यापुढेही रामदास कदम आणि आम्ही सर्वजण पक्षासाठी एकत्र काम करणार  असल्याचे राऊतांनी सांगितले. 


रामदास कदम यांना शिक्षा?


काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्यासाठी रामदास कदम यांची फूस होती अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यामुळे शिवसेना नेतृत्व त्यांच्यावर नाराज असल्याचे म्हटले जात होते.  


इतर महत्त्वाच्या बातम्या:


अकोल्यात 'बाजोरिया पॅटर्न' मोडीत काढण्यासाठी भाजपची व्यूहरचना


Vidhan Parishad : भाजपचे उमेदवार जाहीर; मुंबईतून राजहंस सिंह, नागपूरातून बावनकुळे तर सतेज पाटलांच्या विरोधात अमल महाडिक रिंगणात


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha