नाशिक : तोडफोडीच्या घटनांनी नाशिकजवळील घोटी परिसर ढवळून निघाला. गुरुकृपा या खाजगी रुग्णालयातल्या 2 दुर्घटनांमुळे संतप्त नातेवाईकांनी जोरदार गोंधळ केला. एका बाळासह 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची जोरदार तोडफोड केली.

नातेवाईकांच्या तक्रारीनंतर 5 डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आलं.12 वर्षीय कविता दुभाषे या मुलीला रात्री पोटात दुखू लागल्याने गुरुकृपा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र सकाळी तिची प्रकृती बिघडू लागल्याचं कारण देत डॉक्टरांनी तिला दुसऱ्या हॉस्पिटल नेण्यास सांगितलं. याचदरम्यान मुलीचा मृत्यू झाला.



दुसरीकडे अश्विनी भोर ही 35 वर्षीय महिला काल रात्री याच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाली. यानंतर सकाळी सिझरिंगवेळी तिचं बाळ दगावल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला आणि हॉस्टिपलवर संक्रात आली.

दरम्यान आता रुग्णालय परिसरातील वातावरण निवळलं आहे. रुग्ण दगावले आणि हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी घोटी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविछेदन अहवाल आल्यावर पुढील कारवाई होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.