नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नाशिकच्या आडगाव परिसरातील मराठा विद्या प्रसारक समाज रुग्णालयातील हा प्रकार आहे.


उपचार घेणाऱ्या अंजली बैरागी या 42 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. कृत्रिम श्वास नलिकेमध्ये झुरळ अडकल्याने त्यांना श्वास घेता आला नाही आणि यामुळेच मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला.

पाच दिवसांपूर्वी विष प्राशन केल्याने अंजली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी रात्री त्यांची प्रकृती अधिकच खालावली, हे बघताच अंजली यांच्या मुलाला डॉक्टरांनी मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी पाठवलं.

अंजली यांचा मुलगा औषध घेऊन येताच आईला व्हेंटिलेटरवर शिफ्ट केल्याचं त्याला सांगण्यात आलं. मात्र, तिथे झुरळ असल्याचं निदर्शनास येताच नातेवाईकांनी डॉक्टरांना याचा जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली.

हा वाद सुरु असताना काही वेळातच अंजली यांचा मृत्यू झाला. श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं वारंवार सांगूनही डॉक्टरांनी दुर्लक्ष केलं, असा आरोप नातेवाईकांना केला आहे. शिवाय आईच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही अंजली यांच्या मुलाने केली.