नाशिक : राज्यात यापुढे कोणत्याही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचा ठराव, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने केला आहे. सतत होणाऱ्या बंद आणि आंदोलनामुळे व्यापारी वैतागले असून यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगत व्यापारी संघटनेने हा ठराव मांडला आहे. त्यानुसार आगामी काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या बंदला व्यापारी पाठिंबा देणार नसल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी एबीपी माझाला दिली आहे. तर, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे पुण्याचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनीही या ठरावाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, राज्यभरात व्यापाऱ्यांनी ठराव मोहिमेचा कार्यक्रम हाती घेतला आहे.


मागील काही वर्षांपासून बंद आणि आंदोलनाचे प्रकार देशभरात वाढले आहेत. याचा सर्वात जास्त फटका बसतो तो सामान्य व्यापाऱ्यांना. बंद काळात दुकाने बंद ठेवल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. शिवाय आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडला तरी दुकाने संकटात सापडतात. या सततच्या गोष्टींना व्यापारी वर्ग वैतागल्याने त्यांनी हा ठराव मांडल्याची माहिती दिली आहे.

काय आहे ठराव?
गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणाने समाज ढवळून निघत आहे. विरोधात-समर्थनार्थ मोर्चे काढले जातात. बंद पाळले जातात. अशी आंदोलने ही सरकारच्या निर्णया विरोधात किंवा समर्थनार्थ असतात. परंतु, त्याची झळ सामान्य व्यापाऱ्यांना बसत आहे. व्यापारी म्हणजे सरकार नाही. व्यापारी म्हणजे मुकी बिचारी कोणीही हाका, असा प्रकार झाला आहे. बंद पाळण्यासाठी जे फिरतात. त्यांची कोणतीही "दुकानदारी" नसते. दुकाने बंद करणे हीच त्यांची "दुकानदारी" असते. पण यात आम्हा व्यापाऱ्यांचा काय दोष? आधीच नोटा बंदीपासून आमचे कंबरडे मोडले आहे. त्यात हे बंद आम्हाला भिकेला लावत आहेत. कोणीतरी व्हॉटसअपवर किंवा फेसबुकवर बंदची हाक देते. आणि क्षणार्धात खेड्यापाड्यात, शहरात ही बातमी पसरते. दुकाने उघडी ठेवली तरी ग्राहक येत नाहीत. त्यामुळे येथून पुढच्या कोणत्याही बंद मध्ये व्यापारी सामिल होणार नाहीत. वाटल्यास दंडावर काळ्या फिती बांधून समर्थन देवू, पण दुकान बंद करणार नाही. आमचे दुकान चालू असताना अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस व प्रशासनाने संरक्षण द्यावे. जेणेकरुन आम्हाला दुकाने चालू ठेवता येतील, काही तोडफोड अनुचित प्रकार घडल्यास पूर्णतः शासनाला जबाबदार धरले जाईल. कृपया आपल्या मार्गदर्शनाची व सहकार्याची अपेक्षा, असा ठराव महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने मांडला आहे.

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्समधील महत्वाचे ठराव -
महाराष्ट्रामध्ये इथून पुढे व्यापारी बंद पाळणार नाहीत.
कोणत्याही राजकीय पक्षाच्या बंदला पाठिंबा देणार नाहीत.
राजकीय पक्षांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती केल्यास व्यापारी दिवसभर डाव्या दंडावर काळी निषेधाची पट्टी लावून बंदमध्ये सहभागी होणार

Maharashtra Bandh | मराठवाड्यातही बंद; बीड, नांदेड, हिंगोली, उस्मानाबादमध्ये बाजारपेठा बंद