नाशिक : शहरात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक लग्नसोहळे पुढे ढकलावे लागले होते. आता निर्बंध शिथील होताच प्रत्येकजण कार्यक्रम उरकून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने या सोहळ्यांना परवानगी तर दिलीय मात्र काही नियम आणि अटींमुळे विवाह आयोजक आणि लॉन्स चालकांसमोर नवं संकट उभं राहिलं आहे.
नाशिकच्या उपनगर परिसरात वास्तव्यास असलेले जितेंद्र बोरसे हे बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. यातील मुलगा अजिंक्य आणि मुलीचे यावर्षी लग्न करण्याचे नियोजन होते. मात्र, सततच्या लॉकडाऊनमुळे दोघांची ठरलेली लग्न दोनवेळा पुढे ढकलण्यात आली होती. आता नियम शिथील होताच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुलीचे लग्न ते पार पाडणार आहेत. मात्र, नातेवाईकांचा गोतावळा लक्षात घेता आणि शासनाच्या पन्नासच लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याच्या नियमानुसार मुलाचे लग्न होणे शक्य नसल्याने पुन्हा एकदा अजिंक्यचे लग्न पुढे ढकलण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
एकीकडे विवाह आयोजकांची ही समस्या तर दुसरीकडे मंगल कार्यालय आणि लॉन्सचालकांसमोर वेगळचं संकट आहे. आधीच गेल्या वर्षीही लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असल्याने विवाह सोहळ्यावर अवलंबून असलेली वाजंत्री, कॅटरर्स, मंडपवाले आणि ईतर घटकांवर उपासमारीची वेळ आली होती. आता स्थानिक प्रशासनाने परवानगी तर दिली. मात्र, विवाह सोहळ्यासाठी जून आणि जुलै महिन्यात यापुढे 10 मुहूर्त आहेत. मात्र, यापैकी 4 मुहूर्त हे शनिवार आणि रविवारी येत असून नाशिक जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन कायम असल्याने मोठ फटका त्यांना बसणार आहे. यासोबतच 50 लोकांच्याच उपस्थितीत सोहळे करा ही अटही रद्द करून कार्यालयाच्या क्षमतेनुसार निर्णय घ्यावा, अशी मागणी नाशिक वेडिंग फेडरेशनकडून केली जातीय.
एकंदरीतच काय तर नाशिकमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने निर्बंध शिथील करून प्रशासनाने विवाहसोहळ्यांना परवानगी तर दिली मात्र त्यातील नियम आणि अटींमुळे लग्न करायची तरी कशी? असाच प्रश्न विवाह आयोजक आणि लॉन्सचालकांना पडला आहे.