नाशिक : राजभरातील सुपरमार्केटमधून वाईनची ( Wine ) विक्री करता येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला विविध क्षेत्रातून विरोध होऊ लागला आहे तर द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकांतून सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. विरोधकांकडूनही सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका होत आहे. यावरूनच आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. राज्यात काही नेते वाईनला विरोध करत आहेत. परंतु, वाईनला विरोध करणाऱ्यांच्या साखर कारखान्यात दारू तयार होते, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे. 


छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले. छगन भुजबळ म्हणाले, राज्यात कोणतीही गोष्ट नव्याने केल्यानंतर त्याला विरोध होत असतोच. राज्यात सुरू करण्यात आलेल्या बोट क्लबचंही काही क्षेत्रातून स्वागत झालं तर काही क्षेत्रातून विरोध झाला होता. सध्या राज्य सरकारच्या किराणा दुकानातून वाईन विक्री करण्याच्या निर्णयालाही विरोध होत आहे. परंतु, वाईन ही दारू नसून वाईन कल्चर वाढावं म्हणून प्रयत्न केले जात आहेत. गोवा आणि मध्य प्रदेशमध्ये काय चालू आहे? असा प्रश्न उपस्थित करत जे वाईनला विरोध करत आहेत, त्यांच्या साखर कारखान्यात दारू तयार होते, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. 


दरम्यान, यावेळी छगन भुजबळ यांनी थकित वीज बिलावरही आपले मत मांडले. छगन भुजबळ म्हणाले, महावितरणवर 55 ते 60 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. बिल भरण्यासाठी सरकारकडून विविध पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी थोडे तरी पैसे भरायला पाहिजेत. किमान चालू बिले तरी भरली पाहिजेत, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी यावेळी मांडली. 


राज्यात अनेक ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर, औरंगाबाद, मुंबई आणि उस्मानाबादमध्ये काही विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, "ऑनलाइन झालेलं शिक्षण कागदावर उतरवायचं आहे. आजचे आंदोलन कशासाठी आहे? यावर विचार करण्यात येईल, असे म्हणत राज्यातील पर्यटन स्थळांवरील निर्बध उठवण्यात येत आहेत. सर्व पर्यटन स्थळं बंद करण्यात आली होती ती आता खुली करण्यात आली आहेत. परंतु,नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले. 


महत्वाच्या बातम्या