नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेतील विषय समितीच्या निवडणुकीवेळी सदस्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करत राडा घातला आहे. यात काँग्रेसचा एक गट फुटून भाजप-राष्ट्रवादीला मिळाल्यानं जिल्हा परिषद सदस्यांची पळवापळवीला उधाण आलं होतं. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत काही महिला सदस्यही जखमी झाल्या आहेत.
नाशिकच्या जिल्हा परिषदेत आज विषय समित्यांची निवडणूक घेण्यात आली. यावेळी शिवसेना-काँग्रेस आणि भाजप-राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की करण्यात आली. दरम्यान या निवडणुकीवर शिवसेना-काँग्रेसनं या निवडणुकीवरच बहिष्कार घातला आहे. काँग्रेसचे आठ पैकी तीन सदस्य गळाला लावण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. निवडणुक यंत्रणेनं भाजपाच्या दबावाखाली प्रक्रिया राबवली असा आरोप सेना-काँग्रेसने केला आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या 2 समित्या आणि 2 विषय समित्यांवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बंडखोरांची सत्ता आली आहे. सेना-काँग्रेसने बहिष्कार टाकल्यामुळं राष्ट्रवादीच्या अपर्णा खोसकर यांची महिला बालकल्याण समिती सभापतीपदी, तर काँग्रेसच्या बंडखोर गटातील सुनिता चारोस्कर यांची समाजकल्याण सभापतीपदी निवड झाली. भाजपाच्या मनिषा रत्नाकर पवार आणि राष्ट्रवादीच्या यतिन पगार यांची विषय समितीवर निवड झाली आहे.