नाशिक : एसटी महामंडळाच्या अर्धा तिकिटाच्या योजनेस नाशिक जिल्ह्यातील महिला वर्गाकडून जोरदार प्रतिसाद मिळत असू गेल्या आठ दिवसात जिल्ह्यातून सुमारे चार लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. महिलांना आता माहेरी जाण्यापासून ते नातेवाईकांना भेटण्यापर्यंत येणे जाणे स्वस्त झाल्याने महिला योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एस.टी. बसमधून महिलांना अर्ध्या तिकीटदरात प्रवास करण्याची 'महिला सन्मान योजना' राज्य शासनाने जाहीर केली आणि गेल्या 17 तारखेपासून या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झाली. केवळ अर्ध्या तिकिटात प्रवास करता येणार असल्यामुळे महिला वर्गाचा प्रचंड मोठा प्रतिसाद या योजनेला मिळत आहे. महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेनंतर महिलांच्या प्रवासातदेखील वाढ झाल्याचे दिसून आले आहे. योजनेच्या दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातून तब्बल 60 हजार महिलांनी बसमधून प्रवास केला. रोज प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या 60 ते 70 हजारांच्या घरात असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक आगारात महिला प्रवासासाठी पुढे येत असल्याचे दिसून आले. योजना सुरू होऊन अवघे आठच दिवस झाले असताना महिलांचा प्रतिसाद वाढतच असल्याचे दिसते.
दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून महिला प्रवास करीत असल्याने नाशिकमधून सुमारे 4 लाख 39 हजार प्रवाशांनी या आठ दिवसांत प्रवास केला. तालुक्याच्या गावातील बाजारहाट करण्यासाठी दोन आठवडे आड जात होते. परंतु आता दर आठवड्याला जाता येणार आहे. नातेवाईक असल्याने त्यांची भेटही घेता येईल असही प्रवाशी महिलेने सांगितले.
आठवडाभरात चार लाख महिलांचा सवलतीत प्रवास
महिला सन्मान योजना गेल्या 17 मार्चपासून सुरू झाली. या योजनेला अवधे आठ दिवस झालेले आहेत. या आठ दिवसांत नाशिकमधील 13 आगारांमधून जवळपास 4 लाख 39 हजार 422 महिलानी प्रवास केला. विशेष म्हणजे नाशिक कळवणसारख्या आदिवासी भागातील आगारातून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या आठ दिवसांतच 49 हजार इतकी आहे.
महिला प्रवाशांचा प्रतिसाद वाढता...
महिलांना साधी, निमआराम तसेच शिवशाही यासारख्या बसेसमधून प्रवास करता येणार आहे. 65 वर्षावरील महिलांना यापूर्वीच अर्ध्या तिकिटाची सवलत मिळत होती. आता सर्व महिलांना लाभ होत आहे. नाशिकमधून पहिल्या दिवसापासून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. दुसया दिवशी तब्बल 60 हजार महिलांनी अर्ध्या तिकिटात प्रवास केला. नवीन गाड्यांमधूनही अर्ध्या तिकिटाची सवलत राहणारच आहे. महिला सन्मान योजनेंतर्गत सुरू झालेल्या योजनेत महिला प्रवाशांचा प्रतिसाद वाढतच आहे. नाशिक विभागातील सर्वच आगारांमधून महिला प्रवासी या योजनेचा लाभ घेत आहेत. गेल्या आठ दिवसात नाशिक विभागातील 13 आगारांमधून 4 लाख 39 हजार 422 महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.