नाशिक : नाशिकच्या खड्ड्यांकडे (Nashik Potoles) लक्ष वेधण्यासाठी ‘स्मार्ट खड्डे कवी संमेलन पार पडल्यानंतर आता पुन्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे गणेशोत्सवांना ‘खड्डेग्रस्त नाशिकचे’ देखावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   ‘खड्डेग्रस्त नाशिकचे’ देखावे सादर करण्याची स्पर्धाच आयोजित केल्याचे पक्षाचे राज्य सचिव कॉ. राजू देसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


नाशिक शहरात सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न सध्या शहरातील रस्त्यांची अवस्था पाहून पडत आहे. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात ही गंभीर स्थिती नित्याचीच झाली आहे. 


तर पाऊस उघडल्यानंतर अनेक भागात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामांनी गती घेतली आहे. यामध्ये दगड माती किंवा पेव्हर ब्लॉकच्या साहाय्याने खड्डे बुजवले जात आहेत. दरम्यान यामुळे हवेने धूळ उडत असून वाहनचालकांना धुळीचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे.  दरम्यान पावसामुळे आणि गॅस लाइनच्या कामामुळे शहरातील जवळपास सर्वच रस्ते खड्ड्यात गेले आहेत. त्यामुळे लहान-मोठे अपघात झाले आहेत. मनपा आयुक्तांनी कराराप्रमाणे खड्डे भरून न देणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला खरा पण महापालिकेच्या बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा कोण करणार असा सवाल भाकपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.


अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा


दरम्यान नाशिकचे रस्ते सध्या नॉट ओके स्थितीत असून मात्र मनपाकडून मलमपट्टी केली जात आहे. तर निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार व काही नगरसेवकांमुळे जनतेच्या कराचा पैसा खड्ड्यात गेला आहे. त्यामुळेच पालिकेच्या अधिकाऱ्यांचे, ठेकेदारांचे लक्ष वेधण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात संपूर्ण शहरात सह्यांची मोहिम राबवून महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येत असल्याची माहिती राजू देसले यांनी दिली आहे.


अशी रंगणार स्पर्धा


गणेश जयंतीनिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी खड्डेग्रस्त नाशिककरांची व्यथा देखाव्यांच्या स्वरूपात मांडावी यासाठी गणेशोत्सव सजावट स्पर्धा व फोटो पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये, तृतीय दोन हजार रुपये व सर्व सहभागी मंडळांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर फोटो-पोस्टर स्पर्धेसाठीही पारितोषिक आहेत. त्यासाठी सहभागी नागरिकांनी तल्हा शेख, आयटक कामगार केंद्र, मेघदूत कॉम्प्लेक्स, सीबीएस, नाशिक सदर पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.